Take a fresh look at your lifestyle.

आपलं संभाषण चातुर्य नेहमी दुसऱ्याला आनंद देणारं असावं !

त्याचा दुरुपयोग करणे स्वतःसाठी घातक ठरते.

रामसेतू निर्माण कार्य सुरु होते.नल आणि निल प्रत्येक दगडावर राम नाम टाकीत होते.दगडांना एकत्र ठेवण्याचे कसब सर्व वानर दाखवत होते.प्रभु श्रीराम हे सगळ दुरुन पहात होते.त्यांनाही इच्छा झाली की नुसत्या रामनामाने दगड तरत आहेत.संत तुकडोजी महाराज म्हणतात,
राम-नामाचा महिमा ।
संत जाणताती सीमा ||धृ ||
नामे तारिले पाषाण ।
नामे उद्धारिले जन ||1||
श्रीरामांना वाटले आपणही एखादा दगड सोडावा.आणि प्रभुंनी एक दगड सोडला.पहाता पहाता तो बुडाला.ओशाळलेल्या नजरेने त्यांनी मागे पाहिले.

तुकोबाराय म्हणतात,
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ।
भ्रमळ सकळ भोगितसे।।
तैसै तुज ठावे नाही तुझे नाम।
आम्हीच ते प्रेमसुख जाणो।।
कमळाला त्याच्या सुगंधाचा अनुभव घेता येत नाही. भ्रमरच त्याचा आनंद घेऊ शकतो.तसं देवा तुला तुझ्या नामाचा महिमा माहिती नाही, त्याचा अनुभव आणि आनंद आम्हीच घेऊ शकतो.
श्रीरामांनी मागे वळुन पाहिलं,तर हनुमंतराय उभे होते.प्रश्नार्थक नजरेने प्रभुंनी पाहिल्यावर हनुमंतराय म्हणाले,देवा तुम्ही ज्याला सोडलं त्याचं बुडणं निश्चित आहे.
सज्जनहो हनुमंतरायांना बुद्धिमत्तामवरिष्ठमं म्हटलं जातं.संभाषण चातुर्य कमालीचं आणि हजरजबाबी पणा ठासुन भरलेला असला तरी त्याचा योग्य वापर कसा करावा,याचं हे अत्यंत बोलकं उदाहरण आहे. या जागा चुकल्या की घात निश्चित आहे. रावणानं जटायुला रामाची शपथ घालून विचारलं,तुझा मृत्यू कशात आहे सांग?रामाची शपथ घेऊन खोटं कसं बोलायचं?मग त्यानं सरळ सांगितले, की माझा मृत्यू माझ्या पंखात आहे.मग त्याचं पुढे काय झालं?हे आपण जाणताच.
हाच प्रश्न रावणाने रामाची शपथ घालून हनुमंतरायांना विचारल्यावर हजरजबाबी या रामदुताने उत्तर दिलं,माझ्या स्वामीच्या जीवावर उठलेल्या निर्बुद्ध राजा तुला माझं मरण सांगण्याईतका तुला मुर्ख वाटलो का?
शब्दचातुर्य सतकामी वापरता आलं तर जीवनात दुःख येण्याचे प्रसंग फारच कमी येतात.
रामकृष्णहरी