Take a fresh look at your lifestyle.

व्यर्थ बडबड काहीच कामाची नसते !

त्यामुळे कुणाचेही भले होत नाही.

 

आपण तोंड मिळाले म्हणून काहीही बडबडत रहातो.त्याने आपल्याला विषयसुखाची प्राप्ती होतही असेल.पण यातून कुणाचेही भले होत नाही. उलट अनेकदा संकटांना निमंत्रण मिळते.बोलण्याचा योग्य वापर झाला तर जीवन सुखी होते.हे बोलणे हरीरुप असेल,हरिविषयी असेल तर त्याने स्वतःला आणि ऐकणारालाही समाधान प्राप्त होते. नाथ महाराज म्हणतात,
हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥१।।
बोलायचेच असेल तर हरी बोला नाहीतर अबोला चांगला.व्यर्थ गलबला काही कामाचा नाही. त्याने फालतुचा अभिमान बाळगण्याचेच काम होते.
नको नको मान नकों अभिमान । सोडी मीतूंपण तोचि सुखी ॥२॥
हा मी तु पणा जर सोडता आला तर खरे सुख प्राप्त होईल.
सुखी जेणें व्हावें जग निववावें । अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥३।।
ज्याला सुखी व्हायचं आहे, त्याने जगात शांतता निर्माण करावी,अज्ञानी मनुष्याला ज्ञान देऊन त्याला ज्ञानी करावे आणि सन्मार्गाला लावावे.
मार्ग जया कळें भाव भक्तिबळें । जगाचियें मळें न दिसती ॥४॥
भक्तीप्रेमाच्या मार्गाने ज्याला हे कळते नाथ महाराज म्हणतात, अशी माणसं जगाच्या बाजारात दिसत नाहीत.
दिसती जनीं वनींप्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
परंतु ते जगाच्या बाजारात जरी दिसत नसले तरी त्यांना ते वनात असो की जनात असो मी आओळखीनच असं नाथ महाराज म्हणतात.आपली जगण्याची रितच ही असायला हवी.त्यासाठी तोंडावर आधी ताबा मिळवता आला पाहिजे. त्यासाठी तोंडाला रामनामाची सवय लावावी लागेल.ती आपोआप लागणार नाही. त्यासाठी तसा संग पत्करावा लागेल.
रामकृष्णहरी