Take a fresh look at your lifestyle.

पाडळी रांजणगाव येथे हनुमान जन्मोत्सव!

सालाबाद प्रमाणे यंदाही कावड यात्रा.

पारनेर : तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 16 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोमवारी कावड यात्रा गावातून पैठणकडे रवाना होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक ,आध्यात्मिक कलाविष्काराचे कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
पाडळी रांजणगाव हे गाव अखंड हरिनाम सप्ताह आणि हनुमान जन्मोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा केला जातो. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला ,बोला जय जय हनुमान या घोषाने संपूर्ण गाव दुमदुमून जाते. मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने हनुमान जन्मोत्सव गावामध्ये संपन्न होतो. त्याचबरोबर या उत्सवासाठी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण या ठिकाणाहून पवित्र जल कावड यात्रेच्या माध्यमातून आणले जाते. हनुमान भक्त पायी प्रवास करून पाण्याची कावड हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला गावात आणतात.
गेल्या दोन वर्ष कोरोनाचे या उत्सवावर संकट होते. मात्र ही लाट ओसरल्याने शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पाडळी रांजणगाव या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.11 ते 15 एप्रिल यादरम्यान कावड यात्रा काढण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांच्या वतीने कावड यात्रेकरूंना अन्नदान करण्यात येणार आहे. हरिभक्त परायण लक्ष्मण संभाजी करंजुले, आणि माजी उपसरपंच विनायक उबाळे यांच्याकडून एकादशी निमित्त फराळ वाटप केले जाणार आहे.15 एप्रिल रोजी पळवे येथे कावड यात्रेचे आगमन होणार आहे. सायंकाळी पाडळी रांजणगाव येथे पालखी सोहळा संपन्न होईल. रात्री कला नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी सालाबाद प्रमाणे हनुमान जन्मोत्सव होईल. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले मूळ पाडळी रांजणगावकर हनुमान जन्म उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.