Take a fresh look at your lifestyle.

देवपण म्हणजे आहे तरी काय?

आचार आणि विचारांची संगत त्याशिवाय जुळतच नाही !

तुकोबाराय म्हणतात, ऐरावत रत्न थोर।त्याला अंकुशाचा मार।। ऐरावत म्हणजे हत्ती.पाचपन्नास माणसांचं बळ एकट्या हत्तीत असते.पण तो ते बळ सहसा माणसांविरुद्ध वापरीत नाही. त्यातही तो मनाप्रमाणे वागावा म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी माहुताकडे अंकुश असतो.हत्ती ताब्यात ठेवण्यासाठी त्याच्या गंडस्थळावर वेळोवेळी अंकुशाचा अनकुचिदार प्रहार केला जातो.त्याने त्याला प्रचंड यातना होत असतात.पण तो ते निमुटपणे सहन करीत असतो.मोठेपणही असंच त्रासदायक, यातनादायी असतं.शक्ती असतानाही शांत रहाता येणं म्हणजे देवपण.
लहाणपण देगा देवा।मुंगी साखरेचा रवा।। मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लाकडं फोडु नये.अशी म्हण मोठेपणातलं लहाणपण दाखवण्यासाठी तयार झाली असावी.हे मोठेपणातलं लहानपण स्विकारता आलं तर इतरांचे दोष दाखवण्याची इच्छा होत नाही.
समाजात आपण अशी माणसं पहातो.त्यांच्यावर कितीही टिकाटिप्पणी झाली तरी ते दोलायमान होत नाहीत.ते क्रोधीत होत नाहीत.आपल्या कर्मातुन ते आपलं मोठेपण सिद्ध करीत असतात.समाजहितासाठी झटणाराला देवपण येतं ते याचं कारणाने.आचार आणि विचारांची गट्टी झाल्याशिवाय असं देवपण येत नाही. समाज अशा व्यक्तीला आपल्या ह्रदयात जागा देतो.ती जागा मिळवण्यासाठी केलेली धडपड,यातायात म्हणजे देवपण आहे. आपण देवाला शोधता? की देवाविषयी बोलत रहाता? यावर ते देवपण मिळणार की नाही हे ठरतं.हा सगळा प्रवास काट्याकुट्यांनी भरलेला असला तरी त्यावर चालण्याची एक वेगळी मजा आहे.
दगडाची मुर्ती तयार होताना ती टाक्याचे घाव सोशिलही पण चालत्या बोलत्या माणसाला ते सहन होणं सोपं नाही. देवाला शोधणं म्हणजे कर्माने उच्च होणं आहे. आपणच देव होणं आहे. देवचि होऊनिया ठेलो असं तुकोबारायांनी म्हटलं आहे. पण त्याआधी देव पहावयासी गेलो असं म्हटलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं देव पहाणं कसं आहे?हा विचार ज्याचा त्यानं करायचा आहे. इच्छपुर्तीचा देव सर्वांना हवा आहे. पण कर्मातुन देव होणारे विरळेच आहेत. आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. देव होता आले नाही तरी किमान देवदुत तर नक्की होता येईल.
रामकृष्णहरी