शिर्डी :येथील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे श्री साई मंदिरात उपस्थित असल्याचे फोटो काही दिवसापूर्वी सोशल माध्यमात व्हायरल केल्या संदर्भात साईबाबा संस्थानचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांना जबाबदार धरून शिर्डी पोलिसांनी त्यांच्यासह अन्य पाच जणांना अटक केली असून या प्रकरणामुळे शहरात तसेच संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर व परिसरात सध्या कोरोनामुळे साईभक्तांना बंदी आहे. तसेच साई मंदिराची सुरक्षा ध्यानात घेऊन मंदिरातील कोणाचेही फोटो किंवा व्हिडिओ बाहेर सोशल माध्यमावर व्हायरल करण्यास संस्थान प्रशासनाकडून बंदी आहे.असे असतांंना नियमाचा भंग करत संस्थान प्रशासनाने व त्यांच्या अधिकाऱ्यांनी साई मंदिरामध्ये ३१ ऑगस्ट २०२१ रोजी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व समितीचे सदस्य धर्मदाय आयुक्त अहमदनगर हे उपस्थित असल्याचे फोटो सोशल माध्यमात प्रसिद्ध झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश तसा धर्मादाय आयुक्त यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.
सुरक्षेच्या दृष्टीने यास जबाबदार असणारे साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, साईसंस्थान सीसीटीव्ही विभागाचे विनोद कोते यांच्यासह अजित जगताप, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आणि चेतन साबळे या सर्वांवर साईमंदिर सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून १३ विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने व शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करत आहेत.