Take a fresh look at your lifestyle.

देहाविषयी उदासीन होता आले पाहिजे !

देहाविषयी आसक्ती म्हणजे दुःख.

देहाविषयी आसक्ती निर्माण झाल्याने जगण्याची परिभाषा बदलते.देहसंबंधाने मन विषयांकडे धाव घेत रहाते.पण शरीर एक दिवस जीर्ण होणार आहे याचे भान सतत ठेवले पाहिजे.त्याचे किती लाड करायचे हे ठरवता आले पाहिजे, तसे ठरवता येते पण तसे प्रयत्न केले पाहिजे.आसक्ती संपली की खरी जगण्याची मजा घेता येईल. कारण मिळवण्यासाठी जगणं थांबतं.भक्ती मार्गात ही जादु आहे. माऊलींनी त्याचं उदाहरण फारच सुंदर दिले आहे. ते म्हणतात,परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देंठीं । तैसें आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥ ४१३ ॥
(जर देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का ? तर त्यांनी ठेवला नाही किंतु केवळ त्यांच्या आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात). वायु आपल्याबरोबर फुलातील सर्व सुगंध घेऊन गेल्यावर मग केवळ देठाला जसे सुगंधशून्य फूल रहाते, त्याप्रमाणे भक्ताचा देह (केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ) आयुष्य धरून ठेवते. ॥९-४१३॥
फुल उमलले की सुंगध दरवळतो.पण वाऱ्याबरोबर सुगंध निघुन जातो आणि त्या देठाला असलेलं फुल सुगंधशुन्य होतं,पण दृश्य रुपाने फुल तसेच रहाते.मनुष्य देहात ही अवस्था यायला हवी.जीवंतपणीच कर्तव्य संपावीत,तसं हे सहज होत नाही पण अध्यात्म या विचारापर्यंत आणुन सोडते.
तुकोबाराय म्हणतात,
आला शितळ शांतीचा वारा।
तेणे सुख झाले या शरिरा।।
हा शितळ शांतीचा वारा कोणता आहे? जसं रणरणत्या उन्हात दाट वृक्षाच्या सावलीत बसायला मिळालं की शरिराची होणारी लाहीलाही थांबते.ती शितलता मनाला आणि शरिराला सुख प्राप्त करुन देते.तसं दुःखानं जर्जर झालेल्या मनाला आसक्ती झटकून उदासीन रुप सावलीत बसता आले की खरे सुख प्राप्त होते.
जीवन जगण्याची ही कला आपण लवकरात लवकर शिकायला हवी.मी या वाटेवरचा पांथस्थ आहे. थोडं जरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.
रामकृष्णहरी