Take a fresh look at your lifestyle.

संजय राऊत शिवसेनेचे की, राष्ट्रवादीचे यावर ‘पीएचडी’ करावी लागेल !

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचाच आहेर दिला आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाल्याचा घणाघात गीते यांनी यावेळी केला.ते रायगडमध्ये बोलत होते.

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना, त्यांनी हा हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असे सांगत अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

गीते यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र यावर आता भाजपाचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याची, नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. एकच आवाज येईल, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे हे ‘पोलिटिकल सुसाईड’ आहे. ही युती नकोच.’ अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पी.एच. डी. करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचे जेवढे कौतुक करत नाहीत त्यापेक्षा जास्त शरद पवारांचे करत असतात. मी हमखास सांगतो, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा, त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे पोलिटिकल सुसाईड आहे.