Take a fresh look at your lifestyle.

उच्च कुळात जन्म घेऊन उच्च होता येत नाही !

कर्मानेच योग्यता ठरते.

अनेकदा अशी उदाहरणे समोर येतात,उच्च कुळात जन्माला येऊनही त्यांना काहीच करता येत नाही.उलट ते अशोभनीय काम करत रहातात.कबिरजी म्हणतात,
ऊंचे कुल की जनमिया, करनी ऊंच न होय |
कनक कलश मद सों भरा, साधु निन्दा कोय ||
कबिरजी म्हणतात, की जसे उच्च कुळात जन्म घेतल्याने उच्च स्थान प्राप्त होत नाही, मानसन्मान,मोठेपण आपोआप मिळत नाही. जशी सोन्याच्या हंड्यात दारु भरलेली असेल तर तो सोन्याचा हंडा सुद्धा सत्पुरुषांकडुन निंदनीय ठरतो.
सज्जनहो मनुष्य देह हे सोन्याचे भांडे आहे.कोणत्याही कुळात जन्माला आल्याने केवळ कर्मानेच उच्च होता येते.मिळालेला देह सोन्याचे भांडे आहे याचा बोध झाल्याशिवाय त्याची महत्ता वाढत नाही. दुसऱ्याला हिन लेखणे,त्रास देणे,द्वेष करणे ही वृत्ती देहाचं सोनं होऊ देत नाही.अनेकदा असं अनुभवास येते की एखाद्याच्या मृत्यूनंतर माणसं म्हणतात, बरा गेला खूप लोकांना त्रास दिला याने. असं जीवन जगल्यावर ही अवहेलना वाट्याला येणारच.पण सोन्याच्या भांड्यात दारु भरल्यावर वेगळं काय होणार?आपण सत्कर्मानेच ही सोन्याची चकाकी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चकाकी ठेवण्यासाठी घासणं अपरिहार्य आहे. समाजासाठी झिजणं हा राजमार्ग आहे.

राजमार्ग हा शब्द मुद्दाम वापरत आहे. राज शब्दातच त्याचं महागडंपण आहे. त्यामुळे चांगल्या विचारांचा राजाच या मार्गावर चालु शकतो.परोपकाराची घासणी सोबत असली की हा सुवर्णदेह चकाकणारच.त्याचा हेवा इतरांना न वाटला तरच नवल!त्याचा हेवा कुणी प्रेमाणे व्यक्त करील तर कुणी द्वेषाने ते महत्त्वाचे नाहीच.सोन्याचं सोनेपण सिध्द झालं की त्याला कुणी लोखंड म्हणून हिनवलं तरी त्यानं काही फरक पडत नाही.
रामकृष्णहरी