Take a fresh look at your lifestyle.

मिळालेलं किंवा मिळवलेलं मोठेपण विकारात अडकु नये !

अन्यथा मोठेपण हाच आजार होतो.

तुकोबारायांनी अनेक अभंगामधुन लहानपण कसं सांभाळावं याचं मार्गदर्शन केलं आहे. उदाः सकळांचे पायी माझे दंडवत।तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा।मज पामराला काय थोरपण।पायीची वहाण पायी बरी।।मज दास करी त्यांचा।संतदासांच्या दासांचा।। आम्ही किंकर संतांचे दास।संत पदवी नको आम्हास।। अशा कितीतरी अभंगातुन तुकोबारायांनी स्वतःला लहान संबोधलं आहे.
वास्तविक जगद्गुरू पदाला प्राप्त झालेले तुकोबाराय वारंवार लहान रहाण्याचा संदेश संपूर्ण जगताला देत आहेत. कारण मानवी शरिराचा अभ्यास त्यांनी चहुअंगाने केला,अंतर्बाह्य केला.दुःखाच्या प्राप्तीची नेमकी कारणं शोधली आणि ती दुर करण्यासाठी काय केलं पाहिजे?याचं योग्य मार्गदर्शन अभंगरुपाने आपल्या समोर ठेवले आहे.
आपल्याला मिळालेलं किंवा आपण मिळवलेलं मोठेपण आनंदाचा अडसर ठरु नये.सात्विक संयमाने मोठेपण मिळवणं हे मानवी कौशल्य आहे पण ते टिकवण्यासाठी माणसाचाच देव व्हावा लागतो.देव म्हणजे तरी काय?
दुसऱ्याचं अस्तित्व जपणं म्हणजे देव होणं आहे. इतर जीवांचं अस्तित्व आपल्या डोळ्यात खुपते.आपल्या मनाप्रमाणे न वागणारी माणसं,आपलं म्हणणं न ऐकणारी माणसं,लौकिक मिळवणारी माणसं आपल्यात द्वेष निर्माण करतात.कारण कर्तव्य नसताना मोठेपण मिळवण्याच्या इच्छेने जळावच वृत्ती निर्माण होते. कर्तव्य करुनही लहानपण स्विकारण्याची शक्ती म्हणजे मोठेपण,अपमान पचवण्याची शक्ती म्हणजे मोठेपण.संतत्वाचा विचार हेच सांगतो.मुक्ताबाई महाराज म्हणतात, संत जेणे व्हावे।जग बोलणे सहावें।।मोठेपण जपताना लोककल्याणाचा विचार जगत असाल तरी लोकनिंदा वाट्याला येणारच.ती मनावर न घेता जगता आलं की संतत्व प्राप्त होतं.मोठेपण जपताना संत विचारांची कास धरली की मग पाय कायम जमिनीवर रहातात.
रामकृष्णहरी