Take a fresh look at your lifestyle.

आपलं वैकुंठगमन चांगलं होण्यासाठी झटावं !

आयुष्यभर त्याची काळजी घेतली पाहिजे.

अज्ञान वयात चुका घडतात.पण सज्ञान झाल्यावर चुका सुधारता यायला हव्यात.स्वतःचं झाकुन ठेवून दुसऱ्याचं वाकुन पहाण्याची सवय ही अज्ञानात मोडते.वयाच्या कोणत्या वर्षी ज्ञान झाले तेथुनच वय मोजले पाहिजे. जगण्याची खरी मजा तेथुन पुढेच घेता येईल. कारण त्यापुर्वी जे काही जीवन जगलात त्याला फक्त कुटाणे म्हणता येईल. दुसऱ्याचं काय आणि कसं चाललय याचा अभ्यास करण्याची वृत्ती म्हणजे कुटाणे.अंतकाळी या सर्वांचा हिशोब चुकता करावा लागतो.तेव्हा समाज सुद्धा निष्ठुर होतो.
समाजाचं हे निष्ठुर होणं एकाएकी नसतच.आपल्या आयुभराच्या कुकर्माचा तो परिपाक असतो.आपल्यावर ही वेळ येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं,अगदी पापाचरण करणाराला सुद्धा.निसर्ग त्याची चोख व्यवस्था करतो.बाभळीच्या झाडाला आंबे येत नाहीत, ऊस कधी तिखट लागत नाही, भुईमुगाच्या शेंगात कधी हरभरे निघत नाहीत. पण….अपवाद मनुष्य आहे. बैल,बोकड,साप,वाघ,शेळी,मांजर,लांडगा अशा अनेक उपाध्या मनुष्य आपल्या कर्मातुन मिळवतो.आपलं या जगातुन जाणं आपल्यासाठी आनंदाचं व्हायला हवं.हे बोलण्याइतकं सोपं अजिबात नाही.
स्थावर जंगम कमावण्यात दंग होणाऱ्याला हे अशक्य आहे.अंगात रग आहे तोपर्यंत स्वतःसाठी विचार करण्याची संधी आहे. एकदा हे शरीर गलितगात्र झालं की मग पुन्हा नवा रस्ता निवडता येत नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय.हे आपल्या वैकुंठ गमनाचं सत्य आहे.
तेवढं तरी वाट्याला आलं पाहिजे. आपलं जाणं क्षणभर तरी दुःखदायक व्हावं एवढी तरी जागा जगाच्या ह्रदयात मिळवता यायला हवी. संत कबिरजी म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए, जग हँसे हम रोये,
ऐसी करनी कर चलो, हम हँसे जग रोये ती खरी स्थावर जंगम आहे. ती आहे,पुढच्या पिढीसाठी ठेवलेली चोरी न जाणारी ठेव.
रामकृष्णहरी