भाळवणी : सध्या लवकरच उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहेत,त्यामुळे आगामी काळात होणारी पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबविण्यासाठी ढवळपुरी येथील व सध्या मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थिरावलेल्या भालेराव बंधूनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन जलशुद्धीकरण यंत्र भेट देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तहान भागविली आहे.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावच्या खारवाडीचे मुळचे रहिवासी असलेले चंद्रकांत भालेराव व राजेंद्र भालेराव हे दोघे बंधू नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावले आहेत.दोघेही चांगल्या पदावर कार्यरत आहे.मात्र,गावाबरोबरच परिसरातील गावांची त्यांची नाळ जोडलेली आहे.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या बंधूंनी भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराबरोबरच तालुक्यातील इतर कोव्हिड सेंटरलाही लाखो रुपये किंमतीचे ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटर भेट दिले आहेत. तसेच कोरोना काळात गोरगरिबांच्या मदतीला हे बंधू धावून गेले होते याच जाणिवेतून त्यांनी खारवाडीसह भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दोन जलशुद्धीकरण यंत्र नुकतेच भेट दिले.
पंचायत समितीचे माजी सभापती केरूअण्णा रोहोकले यांच्या हस्ते हे जलशुद्धीकरण यंत्र शाळेला भेट देण्यात आले.यावेळी भाळवणीच्या सरपंच लिलाताई रोहोकले,उपसरपंच संदीप ठुबे,शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव चेमटे, उपाध्यक्ष सुभाष रोहोकले,सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश रोहोकले ,कादरभाई शेख, नंदकुमार चेमटे, बी.वाय.रोहोकले आदी,यावेळी उपस्थित होते.
माजी सभापती केरूअण्णा रोहोकले यांनी भालेराव बंधूंच्या संकल्पनेचे स्वागत केले तर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब घुगे यांनी दूरध्वनीद्वारे या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
