Take a fresh look at your lifestyle.

आमदार नीलेश लंके यांच्या कारकिर्दीस झळाळी देणारा वाढदिवस !

लवकरच मंत्रीपद मिळणार ?

✒️ संजय वाघमारे
आमदार नीलेश लंके यांचा गुरुवारी (१० मार्च) पार पडलेला वाढदिवस त्यांच्या दैदीप्यमान राजकीय कारकिर्दीस झळाळी देणारा ठरला.
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला सामुदायिक विवाह सोहळा,त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती,त्यांनी केलेले कौतुक यामुळे आमदार नीलेश लंके यांना थेट राज्य पातळीवर बळ मिळाले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाषणात आमदार नीलेश लंके यांनी आजवर केलेल्या कामाचा आढावा घेतानाच त्यांचे तोंडभरून कौतुक केले.आमदार लंकेकडून शरद पवारांना काही मागायचे नाही किंवा काही घ्यायचे नाही.त्यामुळे त्यांनी केलेले कौतुक तोंडदेखले नव्हते हेही स्पष्ट आहे.आमदार नीलेश लंके यांचा कोणताही कार्यक्रम टाळायचा नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे हे आवर्जून सांगताना आमदार लंके यांची भविष्यातील वाटचाल उज्वल असेल हेही पवारांनी अधोरेखित केले.
गुरूवारचा (१० मार्च)दिवस देशाच्या राजकारणात उलथापालथ घडवणारा होता.पंजाब वगळता उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यासह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले होते.या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणातील विरोधी आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार दिवसभर व्यस्त असणे नैसर्गिक होते.चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षात उत्साह संचारला होता.राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आघाडी सरकारला आव्हान देण्यास सुरुवात केली होती.असे असतानाही शरद पवार यांनी व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आमदार लंके यांच्या वाढदिवसाला आवर्जून हजेरी लावली.ही बाब आमदार लंके,शरद पवार यांच्या ‘गुड बुक’ मध्ये वरच्या स्थानावर असल्याचे अधोरेखित करणारी आहे.
शरद पवार यांचे जुने सहकारी,माजी आमदार दादा कळमकर यांनी थेट तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आडवळणाने आमदार लंके यांना मंत्रीपद देण्याची गळ पवारांना घातली.पवारांच्या उपस्थितीत मंत्रीपदासाठी गळ घालणे याला विशेष महत्त्व आहे कदाचित कळमकर आणि शेख यांना लंकेे यांच्या मंत्रीपदाची चाहूल लागली असावी असे मानण्यास पुरेसा वाव आहे.एकूणच आमदार लंके यांचा वाढदिवस त्यांच्या उज्वल भविष्याची चूणूक दाखवणारा ठरला.त्यांच्या दैदीप्यमान राजकीय कारकिर्दीस झळाळी देणारा ठरला.