Take a fresh look at your lifestyle.

अजितदादा,चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा !

रूपाली चाकणकरांची खोचक मागणी.

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकत्याच केलेल्या विधानावर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांना उपहासात्मक टोला लगावला आहे. चंद्रकांतदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्नच आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे.त्यामुळे वित्तमंत्री अजितदादांनी त्यांच्यावर करमणूक कर लावावा, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी खिल्ली उडविली आहे.

‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केले होते. त्यानंतर चाकणकरांनी चंद्रकातदादांची खिल्ली उडवली. खिल्ली उडवणारं ट्विटच रुपाली चाकणकर यांनी केले आहे. तसेच अजितदादांना विनंती करत चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी केंद्राच्या जीएसटी परताव्यावरही बोट ठेवले आहे.

▪️निदान त्यामुळे तरी सरकारचा भार हलका होईल.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.”

▪️त्यामुळेच होतात वार-प्रतिवार

रुपाली चाकणकर सातत्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत असतात. चंद्रकांतदादांनी आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केल्यानंतर चाकणकर हल्ले परतावून लावत असतात. बऱ्याच वेळा चाकणकर आणि चंद्रकांतदादांमध्ये वार-प्रतिवार होत असतात.

▪️चंद्रकांत पाटील म्हणाले होते की…

देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलंय. किरीट सोमय्या प्रकरणावरून पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.

▪️अजित पवारांबरोबर शपथ घेणे ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती.

‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा सवाल पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य केलं आहे. त्याचवेळी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.