Take a fresh look at your lifestyle.

त्रयस्थपणे स्वतःकडे पहाण्याची शक्ती प्राप्त करुन घ्या.

शरीर म्हणजे मी नव्हे!

आपण शरीरशास्रावर फार अभ्यास करतच नाही हे अगदी सत्य आहे. कारण बाहेरचं जग पाहून तसा वेळ मिळतच नाही. जगातील दृष्याने भुलुन सतत काहीतरी नवीन मिळवण्यासाठी मन धडपडत रहाते.आकर्षण हा मनाचा विषय असला तरी बौद्धिक शक्ती योग्य अयोग्य गोष्टींचा अभ्यास न करता खर्च करण्याचा सर्वसाधारण जीवाचा शिरस्ता आहे.
अभ्यासानेच आकर्षण कमी होणार आहे.हा अभ्यास स्वतःला स्वतःपासून वेगळे करुनच होऊ शकतो.म्हणजे आपणच आपल्याला तटस्थ राहुन पहायचे आहे. आपल्याच हालचाली आपणच टिपायच्या आहेत.आपण केलेल्या विचारावर तटस्थपणे टिप्पणी करायची आहे.आपल्या असं लक्षात येईल की आपले विचार,निर्णय बरेचदा विकारांशी निगडित असतात.ते हेतुपुरस्सर तयार झालेले असतात.ते द्वेषयुक्त,प्रेमयुक्त,स्वार्थ भावनेतुन तयार झालेले असतात.ते तात्विक आनंद देणारे वाटत असली तरी शेवट हा दुःखातच होणार हे निश्चित समजा.
एखादे उदाहरण पहाणे अगत्याचे आहे.गावाबाहेर झोपडीत एक संन्यासी रहात होता.तो दररोज भिक्षा मागायचा.अगदी मजेत जीवन चालले होते.पण रात्री उंदरांच्या सुळसुळाटाने त्याची झोपमोड व्हायची.एका साधकाला त्याने ही समस्या सांगितली.त्यावर उपाय म्हणून त्याने त्याला मांजर आणुन दिली.आता संन्यास्याला मांजरीमुळे शांत झोप मिळु लागली.पुढे उंदीर संपले.आता मांजर भुकेने रात्रभर ओरडत रहायची.मग संन्यासी रोज भिक्षा मागायला जाताना मांजरीच्या दुधासाठी लोटा सोबत घेऊन जायचा.मग पुढे एका साधकाने गाय दिली.आता मांजरीचे भागुन त्यालाही दुध मिळु लागले.पुढे चाऱ्यासाठी भिक मागता मागता त्याला एका साधकाने जमिन दिली.चाऱ्याचा प्रश्न मिटुन मिळालेलं उत्पन्नाने चार पैशे शिल्लक राहू लागले.मग अजुन चार गायी खरेदी केल्या.पुढे लग्न झाले मुलं झाली,लग्नं झाली.वैचारिक मतभेद होऊ लागले मग भांडण आणि घर सोडण्यात त्याचे पर्यावसान झाले.
आता संन्यासी पुन्हा गावाबाहेरच्या झोपडीत आयुष्य कंठीत आहे.रात्री उंदरांच्या खडबडाटाने तो जागा झाला की, उंदीर,मांजरापासुन सुरू झालेली उन्नती आठवुन तो पुन्हा पुन्हा स्वतःशीच हसत असतो.सुखाच्या वाटलेल्या सगळ्या गोष्टी शेवटी दुःख कशा देतात,याची त्याने प्रचिती घेतली होती.
रामकृष्णहरी