Take a fresh look at your lifestyle.

मनापासून मनापर्यंत येण्यासाठी काय करावे?

मनाची समजून काढता यायला हवी !

मनात असंख्य विचार सतत रुंजी घालत असतात.चांगले वाईट विचार कळतात. पण अहं दुःखावणाऱ्या गोष्टी चुकीच्या असल्या तरी मन त्या विचारापासून परावृत्त होत नाही.हे असच व्हायला पाहिजे हा आग्रह मन सतत धरीत असतं.पण त्याविरुद्ध जर घडले तर बेचैनी वाढते.राहुन राहुन पुन्हा त्याच विषयावर मन विचार करत रहाते.अस्थिरता निर्माण होण्याचं हे मुख्य कारण आहे. ही स्थिती टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
मनाला वेगळ्या दिशेने घेऊन निघाल्याशिवाय बदल अशक्य आहे. त्यासाठी वेळ देता यायला हवा.ही परिस्थिती बाहेरून दिसत नसली तरी आत वादळं सुरू असतात.खाल्लेलं पचणार की नाही हे सुद्धा मनोमय कोश शुद्धीवर अवलंबून आहे.दिवसातला पहाटेचा वेळच यासाठी निश्चित करणे योग्य आहे.
काहींना संध्याकाळी शक्य होईलही पण सकाळी आपला विचार फलक बऱ्यापैकी कोरा असतो.ध्यानाला बसण्याची सवय यासाठीच लावायची आहे.
शुद्ध मनानं बसणं हे आव्हान असणार आहे. म्हणजे ठराविक व्यक्ती आणि त्यांच्यापासून झालेला अथवा होत असलेला त्रास यावर मंथन होणारच.
हेच तर अस्थिरतेचं कारण आहे. सर्वांना प्रत्यक्ष क्षमा करणं जमणार नाही हे गृहीत धरुनच ही साधना करताना मनात सर्वांना क्षमा करण्याची शक्ती निर्माण करायची आहे. याचा परिणाम आपल्याला असा जाणवेल की ताण जागेवर असला तरी त्याचा त्रास कमी झाला आहे. अगतिक होण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागेल.नामधारकांना हे फार लवकर जमते.
रामकृष्णहरी.