Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राची ‘ गोधडी ‘ सातासमुद्रापार! 

'इन्टॅक'ने दिला आधुनिक टच् !

 

पुणे : आई-आजीच्या जुन्या साड्यांपासून तयार होणाऱ्या अन् मायेची ऊब देणाऱ्या गोधड्या बदलत्या फ्लॅट संस्कृतीत हळूहळू काळाच्या पडद्याआड गेल्या अन् बघता बघता त्यांची जागा ‘लुसलुशीत ब्लँकेट’ने घेतली; मात्र पिढ्यान् पिढ्या चालत आलेला वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘इन्टॅक’ने या गोधड्यांना आधुनिक टच दिला असून, ‘एलिट क्लास’मध्ये सध्या डिझायनर महाराष्ट्रीयन गोधड्यांना चांगली मागणी आली आहे.

ऐतिहासिक वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ‘इन्टॅक पुणे चॅप्टर’ या संस्थेतर्फे शहरामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. संस्थेतर्फे विश्रामबागवाड्यामध्ये ‘वारसा’ हे दालन सुरू असून, पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पारपंरिक उत्पादनांची विक्री तेथे केली जाते. या उपक्रमांतर्गत संस्थेने ‘आधुनिक टच’ दिलेली तांब्याची भांडी बनविण्याचे प्रशिक्षण तांबट आळीतील कारागिरांना दिले असून, त्या भांड्यांना पंचतारांकित हॉटेलसह परदेशातही मागणी आहे.

याच धर्तीवर डिझायनर्सच्या मार्गदर्शनातून तयार करण्यात आलेल्या ‘एथनिक गोधड्यां’ना सध्या जोरदार मागणी आहे. ‘वारसा’च्या ‘होम लिनन’ या दालनात संस्थेने अंथरायच्या आणि पांघरायच्या अशा दोन्ही गोधड्यांचे प्रकार उपलब्ध केले आहेत. तसेच, खण आणि इरकलीपासून तयार केलेली ‘कुशन कव्हर्स’ही तिथे उपलब्ध आहेत,’ अशी माहिती ‘इन्टॅक’च्या सुप्रिया गोटुरकर यांनी दिली.