हिंदु धर्म संस्कारात प्रत्येक उत्सवाचं खास महत्त्व आहे. त्यासाठी विशिष्ट दिवसांची देखिल व्यवस्था केलेली आहे. अखंड हरीनाम सप्ताह सात दिवस जसं नुकताच गणेशोत्सव झाला.दहा दिवस त्यासाठी ठरवले आहेत.नवरात्रासाठी नऊ दिवस. तसं पितृपुजनासाठी पंधरा दिवस.
या काळात आपले पुर्वजांचे स्मरण, पूजन होते. भोजनही दिले जाते.पितृ पूजन इतके महत्त्वाचे आहे की त्यासाठी आपल्या शास्त्रकारांनी वर्षातील पंधरा दिवस फक्त त्यासाठी राखून ठेवले आहे.
प्रत्येक तिथीवर मृत झालेल्या व्यक्तीच्या श्राद्धासाठी म्हणून पंधरा दिवस ठेवावे लागले असले तरी त्यासाठी पंधरा दिवस ठेवणे ही गोष्टच पितरांचे महत्त्व दर्शवणारी आहे.
आपण जन्मला येताना मातापित्यांची गुणसूत्रे घेऊन जन्माला येतो.आपण अनेकदा असं अनुभवलं आहे की मुल जन्माला आलं की आजी,आजोबा,पंजोबा नावकरी आला असं म्हणतात त्यामागे गुणसूत्रं हेच विज्ञान आहे.
शरीराचे स्वरूप, होणारे मोठे आजार या गुणसूत्रांवर आधारलेले आहेत. म्हणजे माझे शरीर ही माझ्या पूर्वजांची देणगी आहे. शरीर म्हणजे माझे भौतिक अस्तित्व. मला हे अस्तित्व त्यांच्यामुळे मिळाले म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे पितृ पूजन आणि त्यांचे स्मरण करणे,यावेळी प्रितीभोजनासह,धातुदान,वस्रदान केले जाते.केलेले भोजनदान.
पुर्वजांमुळे आपली संस्कृती,आपले तत्त्वज्ञान निर्माण झाले आहे. मी म्हणून जी काही माझी ओळख आहे ती माझ्या पूर्वजांमुळे आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून पितरांना महत्त्व दिले आहे.
पितर जेवू घालण्या अगोदर नाथ महाराज काय म्हणतात याकडे जरा लक्ष द्या…पिता स्वयमेव नारायण।माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण।ऐसें भावें ज्याचें भजन।सुपुत्र जाणा तो एक।।ज्याचे सेवेने सुखी पितर।तेचिं पितृतर्पन साचार।जिंता अवज्ञा तो अनाचार।मेल्या श्राद्धविचार तो लौकिक।।जो पितृवचन अविश्वासी।तेणे केल्या पापराशी।जो पितृवचन विश्वासी।मोक्ष त्यापाशी ओळंगणा।।२३/३८३एकनाथी भागवत
जीवंतपणी जर माता पित्यांची सेवा घडावी,त्यांच्यातच लक्ष्मी नारायण दिसले पाहिजे असा ज्याचा भाव असेल तो खरा सुपुत्र आहे असं नाथ महाराज म्हणतात.पण जीवंतपणी अवज्ञा करुन,दुःख देऊन मृत्युनंतर पितरांना जेवु घावण्याचा देखावा कुणी करीत असेल तर तो फक्त लौकिक आहे.मोठेपणा मिळवण्यासाठी केलेला खटाटोप आहे.जीवंतपणीच पितृवचन पाळलं तर त्याच्याजवळ मोक्ष लोटांगण घेते असं एकनाथ महाराज म्हणतात.
सज्जनहो आमचा कोणताही सण,उत्सव व्यर्थ नाही पण त्या मागचं जीवनविज्ञान आम्ही समजून घेतले पाहिजे. त्याशिवाय जगण्यातला आनंद प्राप्त होत नाही. जन्माला आल्याचं सार्थक होत नाही.या पितृपक्षात आम्ही पितरं जेवु घालताना दिनदुबळ्या,भुकेल्या जीवाला पोटभर अन्नाचं दान देऊ शकलो तर नक्कीच मानसिक आनंदानं आम्ही तृप्त होऊ.
रामकृष्णहरी