जीवनशैली धावती झाल्यामुळे बऱ्याच जणांकडून जेवणाच्या वेळा पाळल्याच जात नाहीत. यामुळे आम्लपित्त, अपचन, डोके दुखणे, थकवा यांसारखे त्रास सुरू होतात. या समस्या उद्भवू नयेत यासाठी जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या? दोन जेवणांमध्ये किती अंतर असावे, यासाठी काही नियम आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात…
आपल्या शरीरात एक जैविक घड्याळ असते. त्याच ठराविक वेळेला पाचक रस पाझरू लागतात. त्यामुळे पचन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने जेवणाच्या वेळा नियमित असणे आवश्यक आहे. जेवण अनियमित असणाऱ्यांचे जैविक घड्याळ विचलित होते.
आपल्याला 4 वेळा खाण्याची गरज असते. भरपेट नाष्टा (सकाळी 9 च्या आत), दुपारचे जेवण, संध्याकाळचे खाणे व रात्रीचे जेवण असे स्वरूप असायला हवे.
नाश्ता झाल्यावर 4 ते 5 तासांनी दुपारचे जेवण घ्यावे. साधारणतः दुपारच्या जेवणाची वेळ ही 12 ते 1 च्या दरम्यान असावी.
तुमच्या दोन जेवणांमध्ये 3 तासांहून कमी व 6 तासांहून अधिक अंतर शक्यतो नसावे.
रात्रीचे जेवण साधारण 8 ते 9 वाजेपर्यंत व्हायला हवे. रात्रीचे जेवण 7 च्या आसपास करणार्यांनी संध्याकाळचे खाणे टाळायला हवे. या व्यक्तींनी झोपण्यापूर्वी दूध किंवा फळ घेतले तरी चालेल.
रात्रीचे जेवण लवकर घेणे हे आरोग्यदायी आहे. संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान फलाहार, दूध किंवा सवय असल्यास चहा/कॉफी घेऊ शकता.