Take a fresh look at your lifestyle.

पंचकोशावर काम करणे म्हणजे नवजीवन प्राप्त करणे आहे.

सुरुवात अन्नमय कोशाने करावी !

गेल्या दोन तीन भागात आपण पंचकोशांवर बोलत आहोत.ते समजण्यासाठी अवांतर गोष्टीही जाणुन घेत आहोत.शरीर, तन्मात्रा हा त्याचा अविभाज्य घटक आहे. या चर्चेत कुठेही अवघड शब्द येऊन शब्दपांडित्य होणार नाही याची मी पदोपदी काळजी घेत आहे. वेदांत प्रक्रियेतले शब्द सामान्य प्रापंचिक जीवाला कळणं मोठं कठीणच.ते टाळायलाच हवेत. या जाणिवेनेच तो क्लिष्ट वेदांत ज्ञानोबा माऊलींनी साधकांना आईच्या भाषेत सांगितला.तुकोबांनी तो बापाच्या मायेने अभंगाद्वारे सांगितला.आणि हेच सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि सत्य आहे.अवघड शब्द रचना सोपी करुन सांगणं हे वक्त्याचं खरं कौशल्य आहे.
नाथ बाबांनी संपूर्ण साहित्यात सामान्य श्रोता गृहित धरुन साहित्य निर्माण केले.भारुड हे त्याचे अत्युच्च उदाहरण आहे. आपण त्यांच्या पंगतीत कुठेच बसत नाही.ते दिपस्तंभ आहेत.आपण त्यांचाच आदर्श घेऊन जे समजलय ते आपल्या बोली भाषेत मांडणं हे मला यथोचित वाटत आहे. तसा प्रयत्न मी वारंवार करत आहे. काही चुकीचे वाटल्यास अगदी तात्काळ मला सुधारणा करण्याची संधी द्यावी.
अन्नमय कोशावर.विजय मिळवणं महाकठीण असलं तरी ते अशक्य नाही. अगदी आडाणी माणसं यात यशस्वी झालेली दिसतील.एखादा पदार्थ आवडतो म्हणून तो किती खावा?तर याचं सामान्य उत्तर आहे,जीवंत आहे तोपर्यंत म्हणजे मरेपर्यंत खावा.त्यानं तृप्ती होते का?तर त्याचं उत्तर आहे, मेल्यानंतर सुद्धा तृप्ती होत नाही.
जे काही करायचं आहे ते जीवंतपणीच करावं लागणार आहे.जगण्यासाठी मरेपर्यंत अन्न ग्रहन करावे लागणार आहे. आपल्या शरिरात असं अदभूत सामर्थ्य आहे की त्यावर काम करायला सुरुवात केली की ते ज्ञान जागृत होतं.अगदी मोबाईल फोनचा एखादा फोल्डर उघडावा आणि अनेक गोष्टी त्यात साठवलेल्या त्यात सापडाव्यात,इतकं ते सहज आहे. पण गरज आहे त्यावर थोडा आणि प्रसन्न समयी विचार करण्याची.हे कसं साधता येईल?
यावर आपण चिंतन करणार आहोत पण लेख मोठा होतो आहे या काळजीने उर्वरित उद्याच्या भागात पाहु.
रामकृष्णहरी