Take a fresh look at your lifestyle.

मानलं राव “या” आमदारांना !

कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी केले असे काही...

शिरूर : कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी नेत्यांना कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळावी लागते परंतु हेच कार्यकर्ते कधी कशाचा हट्ट करतील याचा नेम नाही. आता हेच पहा ना शिवजयंतीच्या मुहूर्तावर एका कार्यकर्त्याने आपल्या केश कर्तनालयाच्या दुकानाचे उद्घाटन ठेवले होते. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी या दुकानाचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर या कार्यकर्त्यांने आमदारांना दाढी कटींग करण्याचा आग्रह केला. मग आमदारांनीही या कार्यकर्त्याच्या प्रेमाखातर उद्घाटनानंतर याच दुकानात केशकर्तन केले.
पेरणे फाटा येथे शनिवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर आमदार अशोक पवार यांच्या हस्ते ‘एस. कुमार जेन्टस पार्लरचे’ उद्घाटन करण्यात आले. यावेळी दुकानाचे मालक दत्ताआबा गायकवाड यांनी आमदारांना दाढी कटिंग करण्याचा आग्रह केला. आमदारांनी सुद्धा कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी केलेली मागणी मान्य करत आपल्या कार्यकर्त्याच्या हातून दाढी कटिंग करून घेतली. तोपर्यंत उद्घाटनप्रसंगी जमलेले कार्यकर्ते दुकानात थांबून होते. त्या नंतर या दुकानाच्या अनोख्या उद्घाटनाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली.
जनता आणि कार्यकर्ते यांना महत्त्व देऊन कार्य करणाऱ्या अशोकबापूंनी पुन्हा एकदा आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे बापूंच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अशा शब्दांत उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उद्घाटनप्रसंगी झालेल्या छोट्या सभेत आमदार अशोक पवार यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न धावताअसे छोटे मोठे व्यवसाय उभे करावेत व त्यातून स्थानिक अर्थकारणाला चालना द्यावी, असे आवाहन करत दुकानाला शुभेच्छा दिल्या.