Take a fresh look at your lifestyle.

सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताची जोपासना करणार !

संस्थेच्या स्वमालकीची अद्यावत इमारत उभारणार.

पारनेर : जामगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताची जोपासना करणार असल्याचे सांगत,आगामी काळात संस्थेच्या स्वमालकीची अद्यावत इमारत उभारणार असल्याची ग्वाही माता मळगंगा सहकार पॅनलचे प्रमुख सुरेशशेठ धुरपते यांनी दिली.
जामगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत सुरेशशेठ धुरपते मित्र परिवार प्रणित माता मळगंगा सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज (गुरुवारी) मळगंगा मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी श्री.धुरपते बोलत होते.पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदाताई धुरपते,सरपंच अरुणाताई खाडे, सेवा संस्थेचे चेअरमन एकनाथ धुरपते सर्व उमेदवार व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. धुरपते यावेळी बोलताना म्हणाले की,ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून तसेच आमदार निधीतून गेल्या सात वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे करून जामगावचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आगामी काळात देखील जामगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत.सेवा संस्थेची ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवित असून मतदारांचा मोठा पाठिंबा लाभत असल्याने या निवडणुकीत पॅनलचा हमखास विजय होणार असल्याचा विश्वासही श्री.धुरपते यांनी व्यक्त केला.
सेवा संस्थेच्या स्वमालकीच्या अद्यावत इमारतीच्या निधीसाठी आमदार निलेश लंके यांच्याशी चर्चा झाली असून निधी देण्याचा शब्द त्यांनी दिल्याचे सांगत लवकरच या इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी लढवत नाही तर गावच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच नेते मंडळींकडून निधी आणण्यासाठी सत्ता केंद्र ताब्यात असावे म्हणून नव्या जुन्यांची सांगड घालत समविचारी सहकाऱ्यांच्या साथीने निवडणूक लढवीत असल्याचे धुरपते यांनी सांगितले.
गाव पातळीवरील निवडणुका या नात्यागोत्यांवर होत असतात मात्र, सहकारी संस्थेच्या हितासाठी या निवडणुकीत आपण नाते-गोते न पाहता विकास करणाऱ्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन श्री धुरपते यांनी केले.
यावेळी गोविंद शिंदे, माधव मेहेर, दादाभाऊ सोबले, दत्तात्रय चौधरी, दिलीप पवार, प्रकाश धुरपते,मुकुंद शिंदे,पोपट सोबले,गवराम पवार,वसंत मुरकुटे,ज्ञानदेव खाडे,नारायण नाईक,उत्तम चौधरी तसेच माता मळगंगा सहकार पॅनलचे उमेदवार दिलीप गोविंद खोडाळ,रामकिसन सावळेराम ढवळे, एकनाथ बाळाजी धुरपते, बबन हिरामण पवार, गणेश रोहिदास बर्वे, बाजीराव धोंडीबा बांगर, दत्तात्रय रंगनाथ मुंजाळ, दत्तात्रय सदाशिव शिंदे, अंबादास शंकर केदार, लताबाई नारायण तागड, कांताबाई गोविंद शिंदे, आनंदा हरिभाऊ चौधरी ,जालिंदर नामदेव खाडे उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब मेहेर यांनी प्रास्ताविक तर बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले
माता मळगंगा सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत मतदार व ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केल्याने ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. त्यामुळे या पॅनलच्या उमेदवारांच्या विजयावर आजच शिक्कामोर्तब झाल्याची भावना मतदारांनी बोलताना व्यक्त केली.