Take a fresh look at your lifestyle.

वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचार रुजविणे काळाची गरज !

अंनिसचे मिलींद देशमुख यांचे मत.

पारनेर : अंधश्रद्धेविरुद्ध सक्षमपणे उभे राहण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विवेकवाहिनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सदस्य मिलिंद देशमुख यांनी केले.
पारनेर येधील न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय अभिमुखता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर हे होते.
मिलींद देशमुख पुढे म्हणाले, विवेकवाहिनी हा मूल्यविचारांचा कृतिशील कार्यक्रम असून शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे. व्यायाम, वाचन, विवेकविचार केल्यास माणसाचा अंतर्बाह्य विकास होतो आणि माणसाची विवेकबुद्धी जागृत होते. व्यसनांपासून दूर रहा, खादीचा वापर करा, श्रमाला प्रतिष्ठा द्या, अन्य धर्मीय व्यक्तीशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करा, प्रयत्नवादाचा स्वीकार करा असे सांगितले.याप्रसंगी नंदिनी जाधव म्हणाल्या, वाईट गोष्टींचा विरोध करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे.
या कार्यक्रमप्रसंगी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सदस्य डॉ. जगदीश आवटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संजय गायकवाड यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया लहारे यांनी केले.