Take a fresh look at your lifestyle.

बैलगाड्यांच्या थराराने रंगणार ‘रामलिंग’चा घाट !

घाटाचे काम युध्द्पातळीवर सुरु.

शिरूर : महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने शिरूर येथील रामलिंग यात्रा महोत्सवामध्ये सुमारे सात वर्षांनी यंदा बैलगाडा शर्यतींचा थरार रंगणार आहे. या शर्यतींच्या निमित्ताने सध्या रामलिंग घाटाची दुरुस्ती करण्याचे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने युद्धपातळीवर सुरू आहे.
एकेकाळी शिरूरच्या महाशिवरात्री यात्रेत होणारी बैलगाडा शर्यत ही जिल्ह्यात प्रसिद्ध होती. पुणे नगरसह लगतच्या जिल्ह्यातून याठिकाणी शर्यतीसाठी बैलगाडे येत होते. मात्र सात वर्षापासून या शर्यतीवर बंदी आल्याने घाट ओसाड पडला होता. आता सात वर्षांनी बैलगाडा शौकीनांच्या गर्दीने हाच घाट फुलून जाणार आहे. शर्यतीसाठी रोख स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. फळीफोड गाड्यांसाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
सन 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं  रामलिंग घाटात बैलगाडा शर्यतींचा धुराळा पुन्हा उडणार आहे. शासनाच्या सर्व नियम आणि अटींचे पालन करून या शर्यती होणार असल्याची माहिती रामलिंग देवस्थान विश्वस्त कमिटीच्या वतीने देण्यात आली.
या शर्यतीसाठी बैलगाडे घेऊन येणाऱ्या गाडा मालकांना सर्व सोईसुविधा पुरविण्यात येतील त्यांना कुठलीही अडचण भासणार नाही, अशी माहिती शिरूर ग्रामीणचे लोकनियुक्त सरपंच नामदेव जाधव व उपसरपंच नितीन बोऱ्हाडे यांनी यावेळी दिली. मात्र बैलगाडे मालकांनीही सर्व नियम व अटींचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.
शिरूर नगरपालिकेतील सभागृहनेते प्रकाश धारीवाल यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिरूर पंचक्रोशीच्या प्रमुख नेत्यांनी या घाटाची नुकतीच पाहणी केली.