Take a fresh look at your lifestyle.

नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर उद्या पदभार स्विकारणार !

आमदार निलेश लंके व राणीताई लंके यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा.

पारनेर : आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर – नगर पंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकल्यानंतर उद्या (मंगळवारी) नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्ष सौ.सुरेखा अर्जुन भालेकर या पदभार स्विकारणार आहेत.
पारनेर नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके तसेच शिवसेनेचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी प्रतिष्ठेची केल्याने ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला सात तर शिवसेनेला सहा जागा मिळाल्याने नगरपंचायतीची त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती मात्र, शहर विकास आघाडीच्या दोन तर एका अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने बहुमत निर्माण झाले होते. त्यामुळे नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार हे आधीच निश्चित झाले होते.प्रत्यक्ष मतदानात भाजपाच्या अशोक चेडे या नगरसेवकाने देखील राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडी स्पष्ट बहुमत मिळाले.
आमदार निलेश लंके यांना अत्यंत अडचणीच्या काळात पारनेर शहरात विजय सदाशिव औटी यांनी खंबीर साथ दिल्याने नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच औटी यांच्या नावाची चर्चा होती. आमदार लंके यांनी देखील नगराध्यक्षपदासाठी विजय औटी यांना पसंती दिली तर शहर विकास आघाडीच्या वतीने निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झालेल्या सौ.सुरेखा अर्जुन भालेकर यांना दिलेला उपनगराध्यक्षपदाचा शब्द देखील आमदार लंके यांनी पाळला.

विकास आघाडीचे भूषण शेलार व अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनी देखील राष्ट्रवादीला साथ दिली आहे.
नगराध्यक्षपदी विजय औटी व उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची बहुमताने निवड झाल्यानंतर पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आपल्या विचाराच्या सर्व नगरसेवकांच्या जाहिरनाम्यावरील सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी निवडीनंतर बोलताना दिले.
श्री.औटी व सौ.भालेकर यांची अनुक्रमे नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते उद्या (मंगळवारी) सकाळी १० :१० वाजता प्रत्यक्षात पदभार स्विकारणार आहेत .नगराध्यक्ष विजय औटी हे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते तर उपनगराध्यक्षा सौ.सुरेखा अर्जुन भालेकर या जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या हस्ते पदभार स्विकारणार आहेत.यावेळी राष्ट्रवादी व समविचारी नगरसेवक अशोक चेडे,भूषण शेलार,योगेश मते, नितीन अडसूळ,डॉ.विद्या कावरे,सौ.प्रियांका औटी,सौ.निता औटी,सौ सुप्रिया शिंदे,हिमानी नगरे या नगरसेवकांना आमदार निलेश लंके पदाची शपथ देणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.