पारनेर : तालुक्यातील वासुंदे येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बा.ठ.झावरे पाटील यांना रिसेल मार्केट रिसर्च अॅण्ड फिल्म कंपनी यांच्या मार्फत दिला जाणारा सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणार महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार २०२२ सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
संस्थेची स्थापना ९ ऑगस्ट २०११ मध्ये झाली असून अल्पावधीतच संस्थेंने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करत मुख्य कार्यालयासह ७ शाखांच्या माध्यमातून ८१ कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून कर्ज वाटप ६४ कोटी केले आहे. संस्थेने विविध बँकांमध्ये १९ कोटी इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे. गेली दोन वर्षापासून कोरोना व नैसर्गिक आपत्तीच्या संकट काळातही संस्थेने थकबाकीचे व एनपीए चे प्रमाण अत्यल्प ठेवण्यात यश आले.
संस्थेवर सर्वसामान्य ग्राहक व सभासद यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे व कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिकपणा व मेहनतीच्या पाठबळामुळेच पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे संस्थापक चेअरमन बा.ठ. झावरे पाटील यांनी सांगितले. संस्था सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये नेहमीच सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.
संस्थेने ग्रामीण व शहरी भागातील सभासदांना व्यवसायासाठी,शेतीसाठी,उद्योग व्यवसायासाठी,बचत गटांसाठी कर्ज वाटप केले असून सभासदांना अत्याधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून दिले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक संस्थेकडे आकर्षित होऊन संस्थेने प्रगतीचा आलेख उंचावण्यास त्याची मदत झाली आहे.
लवकरच संस्था १०० कोटींचा टप्पा पार करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.