Take a fresh look at your lifestyle.

दुर्जनांची लक्षणं काय आहेत?

आपण सज्जन असल्याशिवाय हे रुचणारच नाही.

 

 

दुर्जनाचा सहवास किती घातक असतो यांचं संत नामदेव महाराज मार्गदर्शन करतात.आणि उताराही सांगत आहेत.

दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा।संग ना करावा पापियाचा।।

सर्पाचें पिलें सानें म्हणवुनि पोशिलें।त्यासी पान दिधलें अमृताचें।।

नव्हे ते निर्विष न सोडी स्वभावगुण।घेऊ पाहे प्राण पोसित्याचें।।

विष्णुदास नामा सांगतसे युक्ती।विवेक हा चित्ता दृढ धरा।।

महाराज म्हणतात दुर्जनाला चार हात दुरच ठेवले पाहिजे.अशा पाप्याचा सहवास घडुच नये. त्याचं उदाहरण देताना ते म्हणतात सापाचं पिलु पाळलं आणि त्याला कितीही दुध पाजलं तरी ते त्याचा स्वभावगुण सोडीत नाही. एक दिवस ते पोसित्यालाच म्हणजे ज्यानं लहानचं मोठं केलं अशा पालणकर्त्यालाच ते दंश करणार.आपण कुणाला पोसतो आहोत याचा विवेक आपल्याकडे असला पाहिजे.

दुर्जनाची लक्षणं सांगताना महाराज म्हणतात,

दुर्जनाची बुद्धी ओखटी दारुण।आपण मरुन दुजा मारी।।

दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी ते स्वतःचाही नाश करुन घ्यायला तयार असतात.

दीपकाची ज्योती पतंग नाशिला।अंधार पडिला जनामधे।।

दिव्यावर पतंग झडप घालतो त्याक्षणी त्याचा विनाश होतो.पण दिवा विझल्याने अंधार होतो.तद्वत दुर्जन स्वतःचा नाश करताना सहवासातील सज्जनांना सुद्धा त्याचा भोग भोगायला लावतो असं महाराज म्हणतात.

माऊली ज्ञानेश्वर महाराज दुर्जन जन्माला आल्यावर काय करतो?त्याची लक्षणे सांगत आहेत,

पोटी उपजले जे लेकं।त्यांची वर्तणूक ऐसी देख।आवडे कांति आणि कणक।उपेक्षिती निःशेख मातापिता।।जे कुडे कुचर कुलट।ते का अत्यंत शतनष्ट।अनाचारी कर्मभ्रष्ट।अतिदुष्ट दुर्जन।।

दुर्जन अपत्या विषयी माऊली म्हणतात,असा पोरगा जर पोटी जन्मला तर त्याला फक्त बायको आणि सोने प्रिय असते.आई वडिलांना त्याच्याकडून प्रेमाऐवजी उपेक्षाच वाट्याला येते.ही मंडळी कर्मभ्रष्ट असतात.पैशासाठी काहीही म्हणजे भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

ज्ञानेश्वरी अध्याय ११मध्ये दुर्जनांचे सविस्तर वर्णन आहे. आपण कुणाच्या संगतीत आहोत याचं भान असलं पाहिजे. असा दुर्जन आपल्या सहवासात असेल आणि आपल्याला त्यात काही गैर वाटत नसेल तर आपणच दुर्जनांच्या पंगतीत बसलेलो आहोत असा त्याचा अर्थ आहे.

रामकृष्णहरी