Take a fresh look at your lifestyle.

साधना कोणतीही असो,त्यात प्रत्याहाराचे विशेष महत्त्व आहे !

ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये वश करण्यासाठी हे गरजेचे आहे.

आपण अनेकदा संकल्प करतो आणि काही दिवसांत तो मोडतो. वरपरत्वे केलेले संकल्प दृढ होत जात असले तरी वय सरण्या अगोदर केलेले संकल्प जीवनाला यथोचित गती देणारे ठरतात.प्रत्याहार हा दृढ संकल्पाचाच एक भाग आहे. पण हा शब्द आहाराशी संबंधित वाटत असला तरी तो फक्त खाण्याशी संबंधित नाही. तो पंचज्ञानेंद्रियांशी आणि तसेच कर्मेंद्रियांशीही संबंधित आहे.
डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा ही माणसाच्या शरीरावर असलेली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.पंचकर्मेंद्रिये म्हणजे वाणी, हात, पाय, पायु (गुद) आणि उपस्थ होत.
या दशेंद्रियांनी प्रत्याहार करणे गरजेचे असते.म्हणजे डोळ्यांनी काय पाहु नये? तर जे वारंवार पहाण्याची इच्छा होते,पण ज्यामुळे अपराधिक भावना अंतस्थ होत रहाते.कानांनी ऐकावी वाटणारी निंदानालस्ती प्रत्याहाराचा भाग आहे.त्याचा त्याग करता आला पाहिजे. नाकाची भुमिका नाक मुरडण्यापलिकडे नसली तरी त्वचा हे ज्ञानेंद्रिये फारच घातक आहे.
हत्ती पकडताना शिकारी मोठा खड्डा खणतात आणि त्यावर लाकडं पालापाचोळा टाकून त्यावर लाकडाची हत्तीन ठेवतात. हत्तीने ती हत्तीन पाहिली की त्याला त्या हत्तीनीचा स्पर्श हवहवासा वाटतो,आणि तो अंगचटिला येतो आणि खड्डय़ात पडतो.आयुष्य धोक्यात येतं.माणसंही याहुन वेगळी नाहीत. भली भली माणसही यात अडकतात.निर्लज्ज होतात.हे आपण कायम पहातो.हे अधःपतन भयंकर आहे.

जिभेला प्रत्याहारात अडकवता येणे मोठे कठीण आहे. द्रोपदीच्या एका डायलॉग बाजीने काय झालं माहिती आहे ना?प्रेक्षागृहात दुर्योधनाची झालेली फसगत!रस्ता समजून पाण्यात पडला.हे पाहुन द्रोपदी हसली आणि म्हणाली, “आंधळ्याचं पोरगं आंधळच.” जिभेला सावरता आलं असतं तर कदाचित महाभारत घडलं नसतं.
कर्मेंद्रियांना या ज्ञानेंद्रियांच्या दादागिरीने कर्म करण्याशिवाय पर्याय रहात नाही.
सज्जनहो खाण्यापिण्याचा प्रत्याहार करणंही ज्याला जमणार नाही तो इतर इंद्रियांना कसं सावरणार? कर्मातील सातत्य ही साधनाच आहे. ध्यानधारणेहुन ती वेगळी नाही.कोणतीही साधना करताना प्रत्याहार जर करता आला तर उर्ध्वगती लाभल्याशिवाय रहाणार नाही. आपण प्रयत्न केले पाहिजेत.अगदी चहा,सुपारी,तंबाखू अशा फुटकळ गोष्टी त्यागण्यापासुन याची सुरुवात करायला हवी.
रामकृष्णहरी