Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना कोरोनाची बाधा !

संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन.

 

 

 

 

कोपरगाव : शिर्डीच्या श्री.साईबाबा संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे कोरोनाबाधित झाले आहेत. फेसबूकवरुन त्यांनी स्वत:च ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी सावध केले आहे. त्यामुळे आमदार काळे समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी आज (रविवारी) त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी”, अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे काळे समर्थकांमध्ये व संपर्कात आलेल्या सर्वांचीच धांदल उडाली आहे.

गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उशीरा राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द केली. यात काळे यांची अध्यक्षपदावर वर्णी लागली. त्यांनंतर 17 सप्टेंबरलाच त्यांनी अध्यक्षपदाचा पदभारही स्वीकारला. यावेळी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करता आ. काळे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल, असेही आ.काळे यांनी म्हटले आहे.