Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या पाणीपुरवठा व जलसंधारणाच्या कामांना आमच्यामुळेच मंजूरी !

"या" कामांच्या उद्घाटनाचा अधिकारही शिवसेनेलाच !

सोनई : राज्याचे पाणीपुरवठा व जलसंधारण ही दोन्हीही खाते शिवसेनेकडेच असून संबंधित मंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांचा भुमिपुजन व उद्घाटनाचा अधिकार शिवसेनेकडेच असून सेनेचे तालुकाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी हा अधिकार वापरावा असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या संवाद यात्रेच्या निमित्ताने आज ( सोमवारी) पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी सोनई येथे संवाद साधला. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास उर्फ बंडूशेठ रोहोकले यांनी तालुक्याच्या प्रश्नांविषयी मंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली.यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, माजी पंचायत समिती सदस्य शंकराव नगरे, सेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी, अक्षय रोहोकले,बाबासाहेब रोहोकले आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रलंबित प्रश्नांना चालना देण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू आहे.प्रश्नांची सोडवणूक करेपर्यंत ही यात्रा सुरूच राहणार असून जलसंधारण व पाणीपुरवठा ही सर्वसामान्यांची जिव्हाळ्याच्या असणारे खाते शिवसेनेकडे असून त्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करण्याचा पक्षाचा प्रामाणिक प्रयत्न असून या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून जिल्ह्याबरोबरच पारनेर तालुक्याला पिण्याचे पाणी व जलसंधारणासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून याचे सर्व श्रेय शिवसेनेचे असल्याने या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन शिवसेनेनेच करावे हे सर्व अधिकार शिवसेनेच्या तालुकाप्रमुख यांना असल्याचेही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.