आपल्या दैनंदिनीत आपला सहजभाव हा भौतिकवृत्तीचं दर्शन घडवतो. दिसतं त्यालाच सत्य मानण्याची वृत्ती असते.भौतिक गोष्टी खऱ्या गृहीत धरून सत्यापासुन दुर रहावे लागते.सतज्ञान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे असेच चालू असते.
माऊली म्हणतात,
आणि निद्रिस्ता चेवो नये । तंव स्वप्न साच हों लाहे । रज्जु नेणतां सापा बिहे । विस्मो कवण ? ॥
अरे अर्जुना, झोपलेला पुरुष जेथेपर्यंत जागा झाला नाही, तेथेपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे. एखादा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला सापच आहे,असे समजून भ्याला तर त्यात आश्चर्य ते कोणते ? जोवर ती दोरी आहे हे कळत नाही तोवर मात्र फसगत ठरलेली आहे.
पण ज्ञान मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे.त्याशिवाय आंतरिकवृत्ती निर्माण होत नाही.आंतरिक वृत्तीने निसंशय जगण्याचे तंत्र प्राप्त होते.कारण संशयीवृती हे भौतिकवृत्तीचेच अपत्य आहे.सत्यत्येबद्दलही संशय निर्माण करण्याची क्षमता या वृत्तीत आहे. आनंदी आणि नितळ जीवन जगु इच्छिनारांनी आंतरिक वृत्तीचा विकास केला पाहिजे. आत्मचिंतन हेच त्याचं प्रवेशद्वार आहे.