Take a fresh look at your lifestyle.

‘पारनेर’ साखर कारखाना विक्रीतील दोषींवर कारवाईची ‘ईडी’कडे मागणी !

बचाव समितीने घेतली केंद्रीय अर्थमंत्री,'ईडी' संचालकांची भेट.

 

पारनेर : सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रीयेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालया (ईडी )कडे केली आहे . बचाव समितीच्या प्रतीनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते माणिकराव जाधव व किरीट सोमय्या यांचीही बचाव समितीने भेट घेतली आहे.

पारनेर कारखाना विक्रीनंतर लगेचच यातील गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली होती . पुढे याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती .ऑगस्ट २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने ईडीला कारवाईचे आदेश दिले होते. परंतु ईडीच्या मुंबई झोन कार्यालयाने याबाबत कोणतीच कारवाई केली नाही . न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई केली जात नसल्यामुळे कारखाना बचाव समितीने ईडीच्या मुंबई झोन अधिकाऱ्यांची तक्रार दिल्लीतील मुख्य संचालक व अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे .

पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीतील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपिठात एकुण तीन याचिका दाखल असून त्यांचे निकाल प्रलंबित आहेत .

पारनेर बचाव समितीने पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे.

पारनेर साखर कारखाना विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला असल्याचा संशय आहे .कारखाना विकत घेणारी खाजगी कंपनी क्रांती शुगर यांच्याकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना सुमारे ३२ कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला होता .

राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबवली होती . तर पारनेर विकत घेण्यासाठी वापरलेले तेवीस कोटी रुपये उद्योजक अतुल चोरडीया व अशोक चोरडीया यांच्याकडून उसने घेण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे .तर उर्वरीत नऊ कोटी रुपये अक्षर लॅण्ड डेव्हलपर्स यांच्या कडून घेण्यात आलेले आहे .आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातुन ही बाब आता उघड झाली आहे.

कारखाना घेण्यासाठी वापरलेला पैसा काळा पैसा असावा असा संशय आहे .

हा व्यवहार पुर्ण करण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याने पैसा पुरवला असल्याची माहीती ईडीला देण्यात आली आहे . आता त्याबाबत ईडी चौकशी करणार आहे.

या विक्री गैरव्यवहारात राज्य सहकारी बँक, क्रांती शुगर,दुय्यम निबंधक पारनेर , अवसायक पारनेर हेही जबाबदार असल्याचे पुरावे ईडीकडे देण्यात आल्याचे बचाव समितीचे साहेबराव मोरे, रामदास सालके यांनी सांगितले .

पारनेर कारखान्याच्या खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच दिलेले होते .बचाव समितीने सर्व पुरावे देऊन वेळोवेळी ईडीकडे पाठपुरावाही केला होता ,परंतु अद्यापही दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने आम्हाला ईडीच्या विरोधात मुंबई झोन कार्यालयाबाहेर दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पासून आमरण उपोषणाची घोषणा करावी लागत आहे . या उपोषणात पारनेरचे शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत .या आंदोलनाबाबतचे पत्र दिल्ली व मुंबई येथील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटुन देण्यात आले आहे.

– रामदास घावटे

– बबन कवाद

( कारखाना बचाव समिती )