Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कलागुणांची जोपासना करावी !

प्रा.अजिंक्य भोर्डे यांचे प्रतिपादन.

पारनेर : महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळ, संगीत,नाटक, वाद-विवाद आदी कलागुण जोपासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री. आनंद कॉलेज पाथर्डी येथील प्रा.अजिंक्य भोर्डे यांनी केले. 
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेरच्या भौतिकशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये प्रा.भोर्डे बोलत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, पदव्युत्तर शिक्षणानंतर देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था,राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, डीआरडीओ, आयुका, आयसर, ओएनजीसी, टीआयफआर आदी ठिकाणी संशोधनाच्या संधी उपलब्ध होतात. विद्यार्थीदशेमध्ये विविध कौशल्य, छंद जोपासले असतील तर अशा विद्यार्थ्यांना चित्रपटसृष्टीमध्ये अभिनय, छायांकन, दिग्दर्शन, पटकथालेखन, संपादन या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.
शैक्षणिक, संशोधन, आंतरराष्ट्रीय कंपन्या, वैद्यकीय क्षेत्र, चित्रपट सृष्टी या विविध क्षेत्रात भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना करीयरच्या संधी उपलब्ध आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा.भोर्डे यांनी संशोधनाकरिता उपलब्ध शिष्यवृत्यांचीही माहिती दिली तसेच याकरिता घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा विषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ.आर.के.आहेर यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळून जीवनामध्ये उंच भरारी घेण्याचे आवाहन केले. डॉ.सुखदेव कदम यांनी कार्यशाळेचा हेतू विशद केला तर प्रा.डॉ.विजया ढवळे यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले तर प्रा.रमेश खराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. देशभरातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वितेकरिता प्रा. निलेश पवार, प्रा.गणेश रेपाळे, प्रा.विशाल शेरकर, प्रा. महेश परजणे, प्रा. रोहन कोरडे व प्रा. प्रमोद मगर यांनी परिश्रम घेतले.