Take a fresh look at your lifestyle.

मा.आ.नंदकुमार झावरे : आक्रमक, अभ्यासू आणि निष्कलंक राजकारणी !

सुसंस्कृत नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख !

 

 ✒️ प्रा.डॉ.हरेश शेळके

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका एक दुष्काळी भाग, सातत्याने पाणी, वीज, रस्ते, शिक्षण या संदर्भात विविध प्रश्न पडणाऱ्या अशा तालुक्याला एक नवी दिशा, नवी आशा-आकांक्षा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम मा. आमदार नंदकुमार झावरे पाटील यांनी केलेले दिसून येते. एका अर्थाने पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून त्यांना ओळखले जाते.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा आपण विचार केला तर आपल्याला असे दिसून येते की, राजकारण म्हटल्यावर खूप कमी वेळा सामान्य माणसाला केंद्रवर्ती ठेवून विचार केला जातो. शेतकरी, कामगार, कष्टकरी, वंचित, मजूर अशा सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम करणे त्यांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करणे, त्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना दिशा दाखवणे, त्यांना चालण्यासाठी वाट तयार करून देणे, त्याच्यासाठी राजकीय व्यक्तीकडे दूरदृष्टीपणा आणि स्वतःचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असावा लागतो तो दृष्टिकोन नंदकुमार झावरे पाटील यांच्याकडे आहे.

त्यांनी विद्यार्थीदशेपासून युथ फेडरेशन चळवळीत केलेले नेतृत्व, आंदोलने, विचारशील आणि भूमिका घेऊन केलेली भाषणे या सर्वांमधून आलेला दिसून येतो.पारनेर तालुक्याचे सलग दोन वेळा ज्यांनी विधानसभेत नेतृत्व केले, ज्यांना खरोखर पारनेर तालुका पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखतो असे आदरणीय नंदकुमार झावरे पाटील यांचा आज वाढदिवस.

आपण पाहतो राजकारण म्हटल्यानंतर आपण राजकीय विषयाकडे फारसे गांभीर्याने कधी पाहत नाही. कारण तो आपला प्रांत नाही, किंवा तो आपला विषय नाही असे आपण सहजपणे बोलतो.परंतु डॉ.आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे राजकारण हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा खूप चांगला मार्ग आहे. हाच मार्ग निवडून नंदकुमार झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्याचे नेतृत्व विधानसभेच्या सभागृहामध्ये अत्यंत कर्तृत्वशील अशा पद्धतीने उमटवलेले आपल्याला दिसून येते. त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची ओळख तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष यांनी अशांत टापू म्हणून केली होती. म्हणजे सभागृहात सर्वात जास्त वेळा प्रश्न विचारणे, जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या प्रश्नाची बाजू लावून धरणे, आपली भूमिका परखड आणि ठामपणे मांडणे, राजकारणातील तत्वनिष्ठता आणि मूल्यनिष्ठता जपणे या सगळ्या गोष्टींचा उपयोग स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अंगीकारून नंदकुमार झावरे पाटील यांनी राजकारणाची एक चांगली फळी निर्माण केली. अत्यंत योग्य टप्पयावर त्यांना पद्मश्री बाळासाहेब विखे पा. शंकरराव काळे, मधुकरराव चौधरी, विलासराव देशमुख, अशा अनेक नामवंत राजकीय व्यक्तींचा सहवास मिळाला.या सर्वांच्या सहवासामुळे त्यांना राजकीय प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करायची, एखादा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करायचे अशा अनेक गोष्टी त्यांनी याच टप्प्यावर स्वतःमध्ये अंगीकृत केलेल्या दिसतात. राजकारणामध्ये त्यांनी अत्यंत मोठे काम केलेले आपल्याला दिसून येते.

दहा वर्ष विधानसभेचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी तालुक्यातील विज, पाणी,रस्ते असे अनेक प्रश्न मार्गी लावले. सामान्यांना आधार देण्याचे काम केले. सुपा एम.आय.डी.सी. त्यांच्याच प्रयत्नातून उभी राहिली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते भूमिपुजन झाले.तर याच कालखंडात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कुंभारवाडीच्या रोजगार हमी योजनेच्या कामांना भेट दिली होती. शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी अत्यंत मोलाची आणि अभिमानास्पद कामगिरी केलेली आपल्या दिसून येते.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये सुरुवातीला सदस्य, खजिनदार, उपाध्यक्ष आणि आता विद्यमान अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. या प्रवासात त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र परिवर्तन कशा पद्धतीने होईल,आपल्या सर्व शाळा, महाविद्यालय या सर्वांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. संस्थेची सर्व शाळा, महाविद्यालये ही अत्यंत रम्य आणि निसर्गरम्य अशा वातावरणात उभी केलेली आहेत. गुणवत्ताधारक शिक्षक, प्राध्यापक वृंद, कर्तव्यदक्ष प्राचार्य त्या ठिकाणी आपल्याला कार्यरत असलेले दिसून येतात. विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या त्यांचे निराकरण, त्यांना विविध सोयीसुविधा, त्यांना राहण्यासाठी वसतिगृह, विद्यार्थिनींना राहण्यासाठी वसतिगृह, सुसज्य प्रयोगशाळा, क्रीडांगणे अशा सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठीमागे त्यांची व्यापक भूमिका आपल्याला वेळोवेळी स्पष्ट होताना दिसून येत आहे. जीवनाकडे अतिशय सकारात्मक आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीचा चौकटीबाहेर जाऊन विचार सातत्याने ते करताना दिसतात.

निघोज परिसरातील पालक बारावीनंतर मुलींचं लवकर लग्न करून देत असत.कारण अवतीभोवती जवळपास मुलीला शिकण्यासाठी पाठवणे अनेकांना थोडसं गैरसोयीचे वाटायचं त्याचबरोबर निघोज या ठिकाणचे विद्यार्थ थोडेसे सधन कुटुंबातील असत. त्यामुळे शिक्षणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसे. त्यातही बारावीनंतर विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्षच केले जाई. या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर नंदकुमार झावरे यांनी मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आग्रह धरून निघोज या ठिकाणी मुलिकादेवी महाविद्यालय सुरू केले. अगदी सुरुवातीलाच प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवेश घेण्यासाठी गर्दी लोटलेली आपल्याला दिसून येते. आज त्या महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावी नंतर निघोज, जवळा परिसरातील मुली मोठ्या प्रमाणात शिक्षण घेताना दिसून येत आहेत.एका अर्थाने तळागाळातला माणूस ते विद्यार्थी येथपर्यंतचा त्यांच्या विचारांचा जो प्रवास आहे.

जो विचारांचा व्यापक दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्याला त्यांनी सातत्याने समाजामध्ये पेरलेला दिसून येतो. या त्यांच्या प्रवासाबद्दल, कर्तृत्वाबद्दल समाजामध्ये त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. राजकारणात तत्त्वनिष्ठ माणसं, विचारशील माणसं ही आज आपल्याला फार कमी प्रमाणात पाहण्यास मिळतात. परंतु कुटुंबातून मिळालेले विचारांचे संस्कार, डाव्या विचारसरणीच्या चळवळीत झालेली जडणघडण , साहित्याचे मोठया प्रमाणात वाचन, नियतकालिके, साप्ताहिके यांचेही बारकाईने वाचन, कार्यकर्त्यांबरोबरचा संवाद, महत्वाच्या राजकीय व्यक्तींचा सहवास या सर्वांतून त्यांचे एक व्यक्तिमत्त्व तयार झालेले आपल्याला दिसून येते.

आज आपण पाहतो राजकारणातली ही अनमोल माणस भावी पिढ्यांसाठी एक दिशादर्शक अशा संस्थाच आहेत. म्हणून मला वाटतं नंदकुमार झावरे पाटील एक व्यक्ती नसून ती एक संस्था आहे. ‘पारनेर दर्शन’ परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !