Take a fresh look at your lifestyle.

शतायुषी समाधान मिळु शकतं का?

ते न मिळण्यामागील दोष काय आहेत?

शतायुषी शब्द या अर्थाने वापरलाय की शंभर वर्षे पुरे आहेत. कारण आयुष्य त्याहून कमी आहे.समाधान कसं असतं?
ते असतं लहान मुलासारखं,निरागस, निसंकोच.खळखळून हसणारं,रुसणारं.आत जे आहे ते चेहऱ्यावर दाखवणारं.
इतकं जर ते सहज आहे तर ते आपल्याजवळ कायम का रहात नाही?
▪️”स्वार्थी प्रपंच”हे त्याचं खरं उत्तर आहे.
पुर्वी स्त्रीया चुल आणि मुल असं मर्यादित आयुष्य जगायच्या.ग्रामीण भागातील स्रिया आजही शेतात मोलमजुरी करून प्रपंचास हातभार लावतात.पुर्वी अनेक सुविधांची वानवा असायची.पण माणसं समाधानी असायची.पैपाहुण्यांकडे आठपंधरा दिवस सहज रमायची.आता हे बदलून त्याची जागा पिकनिकने घेतली आहे. आता पै पाहुण्यांकडे जाऊन आपणास आनंद मिळणार नाही ह्याची खातरजमाच झाल्याची ही पावती आहे. आता पाहुण्यांकडे आपलं जाणं किंवा त्यांचं येणं हे फारफार तर एका मुक्कामाचं.त्यापुढे पाहुणचार टिकतच नाही.
एकाच्या कमाईवर पुर्वी कुटुंबातील सर्व सदस्य टुमटुमीत आयुष्य जगत.आता जोडीनं कमवावं लागतं तरीही पुरत नाही हे वास्तव आहे.आमची बकेटलिस्ट कायम लांबतच चालली आहे. एक गोष्ट मिळतेना मिळते तोच,दहा गोष्टी लिस्टमधे समाविष्ट झालेल्या असतात.त्यात मुलांची शिक्षणं हे शिवधनुष्य पेलताना पाच अंकी पगारावालाही(सरळमार्गी) थकलेला दिसतो.

आपली मानसिकता एवढी बिघडली आहे की आपल्या आश्रयाला असलेली जनावरं, त्यात कुत्रा, मांजर ही कॉमन आहेत. त्यांच्याकडून आपण सतत मानवीय आचरण अपेक्षितो.म्हणजे त्यांना आपण बोललेलं कळावं,त्यांनी टिव्ही, मोबाईल पाहून प्रतिक्रिया द्यावी,आपल्या इच्छेप्रमाणे वागावं हा सतत प्रयत्न.जनावरं माणसासारखी वागताहेत पण आपण माणसासारखं वागत नाही ह्याचा अनेकदा विसरच पडतो.अनेकदा आपण काय करतोय हेच कळत नाही. बोलता बोलता बोलणं विसरतात.हसताहसता हसणं आणि रडतारडता रडणं…..

अति ताणानं हे सारं घडतय हे कळत का नाही?
हो हे सारं कळतय पण अभिमन्यू झाला आहे आमचा.प्रवेश झालाय पण अडकलोय.बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय.पण कसा.?..गुंता झालेले विषय तसेच ठेवून.रिलॅक्स होण्याचे नकोनकोते उपाय शोधले पण…….
यात समाधानाची जागा कुठे लपलीय? विचार केल्याशिवाय सापडणार नाही.
जय जय रामकृष्णहरी