Take a fresh look at your lifestyle.

नगर-पुणे महामार्गावरील वाहतूकीची कोंडी आता सुटणार !

अठरा पदरी रस्त्याच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार.

शिरूर : वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी स्तुप कन्सल्टंन्सी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे.
गेले अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीने पुणे नगर रस्त्यावर प्रवास करणारे नागरिक हैराण झाले होते. याची दखल घेत गतवर्षी २२ जून रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वार्षिक आराखड्यात या कामासाठी रु. ७२०० कोटी मंजूर केले होते. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी २० कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन स्तुप कन्सल्टंन्सीची नियुक्ती करण्यात आली.
वाघोली ते शिरूर रस्त्यासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त झाल्याने वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. या दोघांचेही शिरूरच्या जनतेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी याबाबत एक फेसबूक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत करणाऱ्या शासनासह सर्व प्रतिनिधींचे आभार मानले आहेत.