Take a fresh look at your lifestyle.

चांगलं वागुण कुणाचं भलं झालय?

असं म्हणणारांचं चरित्र जरा तपासून पहा.

 

आपण चांगलं वागुनही दुःख वाट्याला आलं की सहजच मनात प्रश्न पडतो की हेच चांगलं वागण्याचं फळ आहे का?नैराश्य येते.पण चांगलं वागणारा चांगलं वागणं सोडत नाही कारण त्याच्यावर झालेल्या उत्तम सुसंस्काराचा तो प्रभाव आहे. पण चांगलं वागुण कुणाचं भलं झालय असं म्हणणारा जर आपल्या सोबत असेल आणि आपण जर चांगल वागत असु तर आपलं वागणं बिघडण्याची शक्यता जास्त आहे. आपल्याही विचारात परिवर्तन होण्याची शक्यता आहे,की खरच चांगलं वागुन कुणाचं भलं झालय?

सज्जनहो चांगलं वागण्याचं फळ कधीच वाईट मिळत नाही. विचलीत करणारे,आपण लुटलो गेलो आहोत,आपली फसवणूक झाली आहे असे प्रसंग घडतात पण त्याने जीवन उजळून निघते.तरीही अशा प्रसंगापासुन वाचण्यासाठी काय करावं?तुकोबाराय म्हणतात,

जीवनमुक्त ज्ञानी झालो जरी पावन।त्यजावा दुर्जन संगति ही।।

आपण कितीही ज्ञानी झालो अगदी जीवनमुक्त अवस्था प्राप्त केली तरी दुर्जनाची संगत या स्थितीची वाट लावु शकतो आणि पुन्हा आपल्याला मुळ स्थितीला नेऊ शकतो.सोन्याच्या दागिन्यांना चोरांपासुन सतत जपावं लागतं तसं सज्जन व्यक्तीने दुर्जनांपासुन दुर राहिले पाहिजे.

महाराज म्हणतात,

बहु अन्न विष मोहरीच्या मानें।अवघेचि तेणें विष होयं।। भरपूर अन्न पदार्थ तयार केले पण त्या सगळ्या अन्नाला विषमय करण्यासाठी मोहरीएवढे विष पुरेशे आहे.म्हणजेच आपण कितीही सज्जन असा,परोपकारी असा दुर्जनाचा संग तुमची वाट लावणार हे निश्चित समजा.संग कसा असावा?मोहरा होय तोचि अंगें।सुत न जळे ज्याचे संगे।।

एक तर आपणच मोहरा असावं किंवा त्यात ठेवलेला दोरा तरी असावं.खरा मोहरा त्यात दोरा ठेवुन अग्नीत टाकला तर दोरा जळत नाही.केवळ मोहऱ्याचा संग झाल्याने दोरा अग्नीत पडला तरी वाचतो तसा सज्जनाचा संग आहे. दुःखापासुन वाचण्याची शक्ती सज्जन संगतीत आहे.पण त्यासाठी आधी दुर्जन कळाला पाहिजे.उद्याच्या भागात आपण दुर्जन लक्षणे कशी ओळखावी यावर चिंतन करु.ज्यायोगे आपण दुर्जन पंगतीत आहोत का याचा बोध होईल किंवा दुर्जनसंगतीपासुन वाचता तरी येईल.

रामकृष्णहरी