Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना देशभरात लोकसभेच्या शंभर जागा लढविणार !

महाराष्ट्राबाहेर टाकणार दमदार पाऊल.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 2024मध्ये होणाऱ्या परिवर्तनाच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर लोकसभेच्या किमान 100 जागा लढकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत विधानसभा निवडणुका झाल्या की शिवसेना लगेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून येथील निकाल नेहमीच देशाची दिशा आणि दशा ठरवतात. शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर किमान 100 जागा लढवणार आहे. त्यात 15 ते 20 जागा आम्ही उत्तर प्रदेशात लढणार आहोत, असे खा. संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 50 ते 60 जागा लढत आहे. किसान रक्षा पार्टी, अवध केसरी सेना अशा पक्षांसोबत आम्ही युती केली आहे. काही शेतकरी संघटनाही आमच्या सोबत आहेत. नियोजनबद्धपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आमचे पुढचे लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे. विधानसभा निवडणुका झाल्या की लगेच आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहोत, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राबाहेर शिवसेनेने दमदार पाऊल आधीच टाकले आहे. दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. हा भाजपचा गड होता आणि तो शिवसेनेने काबीज केला आहे. तिथून पुढे दक्षिण गुजरातवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. निश्चितपणे लोकसभा निवडणुकीत राज्याबाहेरही शिवसेना आपली ताकद दाखकेल, असा विश्वास खा.राऊत यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशची निवडणूक आणि इथले निकाल देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा काय असेल याचा निर्णय घेतात. यासाठी संपूर्ण देश उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय याकडे लक्षपूर्वक पाहत आहे. उत्तर प्रदेश जो कौल देणार आहे त्यातून 2024मध्ये काय होणार याचा अंदाज येईल.
विरोधी पक्षातील एका प्रमुख नेत्यावर राजरोसपणे पाच राऊंड गोळ्या झाडल्या जात असतील तर त्याचा अर्थ काय? तुम्ही माफियाराज संपलं म्हणता… कायदा-सुव्यवस्थेच्या गोष्टी करता… मग हा हल्ला कसा झाला, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला केला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा त्यांनी निषेध केला.