Take a fresh look at your lifestyle.

खासदार सुजय विखे पाटलांनी लगावला पवार कुटुंबीयांना टोला !

म्हणाले, ''त्यांनी आम्हाला शिकवू नये''

राहता : “आम्ही मिठाला जागावं की नाही, हे जे कधीच कुणाच्या मिठाला जागले नाहीत त्यांनी शिकवू नये”. “राधाकृष्ण विखे पाटील किंवा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हे कोणत्या पक्षाच्या जिवावर नव्हे तर गोरगरिब जनतेने मतदान केले असल्याने राजकारणात टिकून आहेत,” असा टोला खा.डॉ.सुजय विखे यांनी पवार कुटुंबीयांचे नाव न घेता लगावला.
लोकसभेत शुक्रवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांच्या कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, साखर कारखाने, त्यांची अवस्था आणि त्यांच्या घेतल्या जाणाऱ्या कथित राजकीय फायद्यावरुन संसदेत चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना यावेळी डॉ.सुजय विखे पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरून जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला.डॉ. सुजय विखे पाटील यांनी युपीएवर आरोप केला असता सुप्रिया सुळे यांनी यावेळी १० वर्ष तुम्ही ज्यांच्यासोबत होते, गांधी घराण्यासोबत तुमचे जवळचे संबंध होते, ते कदाचित तुम्ही विसरले असाल असे म्हणत खाल्ल्या मिठाला जागा अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे.
“लोकसभेत भाषण करताना मी कोणाचंही नाव घेतले नव्हते. मी फक्त युपीएच्या सहकार क्षेत्राविषयी बोलत होतो. ज्यांनी सहकार क्षेत्र बुडवलं तेचं आज त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मी सांगितलं,” असे त्यांनी म्हटले. तसेच जे अळूच्या वड्या खातात त्यांचाच घसा खवखव करतो असाही टोला डॉ.विखे यांनी लगावला.
▪️लोकसभेत नेमकं काय झालं ?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत या सरकारी योजनांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला. “स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत, शेतकरी सशक्तीकरण हे सगळं सहकारी चळवळीतून सुरू झालं. मी अशा परिवारात जन्माला आलो, जिथे माझे पणजोबा कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. हा स्टार्टअप इंडिया त्यांना दिसू शकला नाही. कारण यूपीए एक आणि दोनमध्ये सर्व साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी कर्ज घेण्यासाठी भाग पाडलं गेलं”, असा आरोप सुजय विखे पाटील यांनी केला.
▪️“मंत्री साखर कारखान्यांचे मालक झालेत”
“यूपीएच्या १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद केले. आज राज्यातल्या ७० टक्के मंत्र्यांनी याच बंद कारखान्यांना फार कमी दरात खरेदी केले आणि आज ते त्यांचे मालक होऊन बसले आहेत”, असा देखील दावा डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला.