Take a fresh look at your lifestyle.

… तर पारनेरला कुकडीचे पाणी मिळणे अशक्य नाही !

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित रेटा देण्याची आवश्यकता.

✒️ बबनराव गायके

पारनेर : तालुक्यातील शेतीच्या शाश्वत कुकडीच्या पाटपाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व काँग्रेस या राज्यातील सत्तेतील पक्षांनी एकत्र येऊन हा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा असा मतप्रवाह तालुक्यातील जनतेतून व्यक्त होत आहे.लोकशाहीमध्ये मत, मतांतरे,मतभेद असू शकतात ते राहतीलच ते मिटणार नाहीत.किमान पारनेर तालुक्यातील कुकडीचे एक टीएमसी पाण्यासाठी एकत्र येवून हा पाणी प्रश्न सोडवावा अशी आग्रही मागणी जनतेतून होत आहे.किंबहुना जनमताचा रेटा पाणी प्रश्न सोडवावा यासाठी एकत्र या असे सांगत आहे. सत्तेमध्ये असणाऱ्या या पक्षाचे नेते मंडळींनी ठरविले तर ते अवघड नाही अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

पारनेर -नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे सरकारमध्ये चांगलं वजन आहे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.अजितदादा पवार जलसंपदामंत्री असताना त्यांनी कान्हूर पठार येथील कुकडी परिषदेत पठार भागासाठी एक टीएमसी पाणी देण्याचे आश्वासन 2000 मध्ये झालेल्या परिषदेत दिले होते. माजी आमदार वसंतराव झावरे यांनी ती परीषद आयोजित केली होती.अजित पवार सध्याच्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना या संदर्भातील सर्व माहिती आहे. त्यांनी ठरविले तर कुकडीच्या एक टी.एम.सी पाण्याचा प्रश्न सहज सुटू शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शिवसेना नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महत्वाचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर कोणतीही अडचण येवू शकणार नाही पण हा पाणी प्रश्न सोडवावा यासाठी राजकिय नेते मंडळींनी मतभेद विसरून जनतेच्या भल्यासाठी एकत्र येवून हा पाणी प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पठार भागाला हे कुकडीचे पाणी मिळाले तर निम्या पारनेर तालुक्याचे भाग्य उजळेल. सध्याच्या सरकारमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पारनेर तालुक्याची चांगली माहिती आहे व पारनेर तालुक्यातील विकास कामांसाठी ते सदैव तत्पर व आग्रही भूमिका घेत असतात. सध्याच्या परिस्थितीत सरकारमध्ये ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत.योगायोगाने सरकार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे आहे. या तीनही पक्षाचे नेते मंडळीमध्ये स्थानिक नेते मंडळींनी समन्वय ठेवून राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन हा प्रश्न निकाली काढावा अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.एक संधी म्हणून याकडे पाहिले तर हा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघू शकतो पण त्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून दुष्काळी परिस्थिती व दुष्काळी पारनेरचे रुप बदलणे या साठी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करुन हा प्रश्न सोडवावा.लोकशाहीमध्ये निवडणुका येतात जातात मत मतांतरे राहतात निवडणुकांचे वेळी निवडणुका जरूर लढवा निवडणुका म्हणजे वैचारिक मतभेद ते राहतीलच पण जनतेच्या या जिव्हाळा असणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेतील या सर्व मित्रपक्ष राजकीय नेते मंडळींनी एकत्र यावेच लागेल असा मतप्रवाह जनतेतून व्यक्त होत आहे.

या प्रश्नासाठी या तीन पक्षात एक कोअर कमिटी स्थापन करावी व या कोअर कमिटीत मोजुन निवडक प्रत्येक पक्षाचे दोन तीन प्रतिनिधी असावेत शक्यतो पाच ते सात जण या समितीत समावेश करून शासन दरबारी त्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांना राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवावी लागेल.श्रेयवादाची बाब बाजूला ठेवावी लागेल तरच या पाणी प्रश्न निकाली निघू शकतो अन्यथा मागचे दिवस पुढे असे समजुनच चालायचे.जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्नासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येवून हा प्रश्न सोडवावा निवडणुकांचे प्रत्येक पक्षाचे नेत्यांनी आपलं वजन त्यासाठी खर्च करणे गरजेचे आहे कारण सततच्या दुष्काळाला जनता कंटाळलेली आहे.

सन 1972 पासून तालुक्याच्या नशिबी पाचवीला पुजलेला दुष्काळ आहे तेंव्हापासून नेते मंडळींचे पाण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.1972 मध्ये दिवंगत माजी आमदार बाबासाहेब ठुबे यांच्या पुढाकाराने कान्हुर पठार येथे माजी मंत्री दिवंगत आबासाहेब निंबाळकर यांचे उपस्थितीत पाणी परिषद आयोजित केली होती. 1979 मध्ये पठार भागाचे पाणी प्रश्न सोडवावा यासाठी मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढला होता व पिंपळगाव जोगाचे पाणी पारनेरला मिळावे यासाठी संघर्ष केला होता.

2000 मध्ये काँग्रेस फुटीनंतर भाळवणी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पाणी परिषद आयोजित केली होती. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. त्यावेळी खासदार गोविंदराव आदिक, तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री व सध्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या परिषदेस उपस्थित होते.या वेळी गोदावरी खोरेतील पाण्यासंदर्भात चर्चा झाली. पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोरेतील पाण्याची तूट भरून काढणे आवश्यक आहे यावर चर्चा झाली व काळू प्रकल्प यावर चर्चा झाली. पुढे हा काळू प्रकल्प माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या काळात व काँग्रेसचे आघाडी सरकारचे काळात पूर्ण झाला.

भाजपा -सेना युती सरकारच्या काळात (सन 2015) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी पठार येथे आले होते.दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकरी वर्गाशी संवाद साधला होता.त्यांनी सुद्धा एक टीएमसी पाणी देण्याचे आश्वासन पठार भागातील शेतकरी वर्गाला दिले होते. तथापि ते केवळ पोकळ आश्वासन राहिले ना कृती ना आराखडा ,ना कोणतीच कार्यवाही झाली नाही.

पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्न निकाली काढावा यासाठी 1967 सालापासून मोरवाडी धरण परिषद ते कुकडी अशा अनेक परिषदा झाल्या तथापि पाणी प्रश्न जाग्यावरच राहिला. सांगली जिल्ह्यातील माण खटाव या दुष्काळी तालुक्यातील उपसा सिंचन योजना दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे चिकाटी धडाडी व महत्वाकांक्षेने पूर्ण झाले व त्या भागाचे चित्र बदलले.सरकार दरबारी जर आपले वजन असेल तर प्रश्न कितीही अवघड असेल तर तो सुटू शकतो हे या उदाहरणावरून लक्षात येते. सध्याच्या सरकारमध्ये आमदार निलेश लंके व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे चांगले वजन आहे व सध्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पारनेर तालुक्याची चांगली माहिती आहे या सर्वांनी या पाणी प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा तालुक्यातील जनता बाळगून आहे.राजकारण हे निवडणुकीपुरतेच मर्यादित ठेवावे. व जनतेच्या ज्वलंत व जिव्हाळा असणारा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.पाणी प्रश्न निकाली निघाला पाहिजे यासाठी जनमताचा रेटा वाढू लागला आहे.

कुकडी धरणांची उंची वाढविण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात यावा यासाठी प्रयत्न करावेत यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत आदेश दिल्याची माहिती समजते. नवीन प्रस्ताव मंजूर झाला तर अजून तीन टीएमसी पाणी कुकडी खोऱ्यात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जादा पाणी उपलब्ध होणार आहे.कुकडीच्या खोऱ्यात जादा पाणी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाल्याने त्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे.

भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील रस्ते विकासातही फार मोठी आघाडी घेतली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी पारनेर तालुक्यात आणला आहे त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून दुष्काळी भागासाठी विशेष निधी उपलब्ध करून देता येईल का व प्रश्न सोडविता येईल का यासाठी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत.सर्व पक्षीय नेते मंडळींनी ठरविले तर हा पाणी प्रश्न सहज निकाली निघेल त्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळींमध्ये एकमत होणे गरजेचे आहे. सर्वच पक्षातील नेते मंडळींनी एक पाऊल पुढे टाकून त्यासाठी प्रयत्न करावेत तरच हा प्रश्न कायम सुटण्यास मदत होईल.

पठारी भागाला शेतीसाठी कुकडीचे पाणी मिळाले तर हा भाग सुजलम सुफलम होईल. पण यासाठी राजकिय नेत्यांचे प्रयत्न व इच्छाशक्तीची गरज आहे.विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 2000 मध्ये पठार भागाला 1 टीएमसी पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता सरकारने करावी व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

सखाराम ठुबे,कान्हुर पठार

वसंत शिंदे,पिंपरी पठार