Take a fresh look at your lifestyle.

फालतु विचारांची भट्टी बंद होत नसेल तर… सावधान !

कोणत्या विचारांनी आयुष्यमान कमी होते अथवा वाढते ?

सकाळी जाग आली की विचारचक्र सुरु झाले ते रात्री झोप येत नाही तोपर्यंत बंद होत नाही. विचारांची गर्दी वाढली की मग झोप सुद्धा गायब होते.झोप कमी झाली की आयुष्यमान घटत चालते.आयुष्यमान घटण्याला अनेक कारणे आहेत.आपण स्वतः होऊन चूका केल्या की ते आपसूकच घडते.कोणत्याही प्रकारचे व्यसन आयुष्यमान घटवते.अगदी सुपारी, तंबाखू सुद्धा अपमृत्यूला पुरेशी आहे.या पुढची व्यसनं आणि त्याचे दुष्परिणाम या विषयी फार काही बोलण्याची गरज नाही.

▪️तर याला कोण काय करणार ?

आपल्यावर कुणी हल्ला करू नये,आपलं जीवन कुणी धोक्यात आणु नये यासाठी आपण किती दक्ष असतो? पण आपणच आपला मृत्यू लवकर व्हावा यासाठी काही व्यसनं सांभाळीत असु तर याला कोण काय करणार? जेंव्हा साध्या तंबाखू खाण्यानं कँन्सर डिटेक्ट होतो,तो क्षण त्या व्यक्तीच्या जीवनात कसा असेल? मला खूप जगायचय पण आता संपलं सगळं.असं तो वारंवार मनाशी म्हणत असेल.आपल्या मृत्युला दुसऱ्या कुणाला जबाबदार धरायचच कसं?

▪️मनोव्यापार आणि विकार यांचा जवळचाच संबंध.

सज्जनहो ही झाली बाह्यांगाने दिसणारी मृत्युची चाहुल.पण स्वतःच्या शरीरांतर्गत होणारी उलथापालथ डोळ्यांना दिसत नाही.आणि ती उलथापालथ व्यसनाहुनही अधिक धोकादायक आहे.मनोव्यापार आणि विकार यांचा खुपच जवळचा संबंध आहे. बाहेरून शरीरात जाणारे पदार्थ रोखून ठेवले तर व्यसनमुक्ती शक्य आहे. पण मनोविचार कसा रोखणार? आपल्या इच्छेनुसार काही घडलं नाही की ते स्विकारता आलं पाहिजे. ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी या लेखाचं महत्त्व खास आहे. इच्छेविरुद्ध घडलेली घटना पचवता आली नाही तर सुरु होते विचारश्रुंखला.

▪️मनाचं द्वंद सुरू झालं तर..

एकाहून एक सरस मनालाच हरवणारे विचार. प्रत्येक विचार नकारात्मकता वाढवणारा.मनाशीच मनाचं द्वंद्व सुरु झालं की ते अगदी मनोविकारापर्यंत म्हणजे मनोरुग्ण होण्यापर्यंत जाऊ, शकतो.मनात अनिच्छेने घडलेल्या घटनांचा एक कप्पाच तयार होतो.अगदी वर्षानुवर्षे जसाच्या तसा.कितीही वर्षांनी तो 

कप्पा उघडला की मनाची अवस्था अगदी ती घटना घडली त्या प्रसंगी जे तिव्र दुःख झालं तशीच होते. हे जीवनासाठी घातक आहे. नुसत्या जगण्यात कसली आलीय मजा? वर्षानुवर्षे दुःखाचं गाठोड घेऊन जगणं म्हणजे हर क्षण मृत्युच. आनंद घेत जगण्यात मजा आहे.मग त्यासाठी काय केलं पाहिजे? पाहुया उद्याच्या भागात.

रामकृष्णहरी