पारनेर : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील ऐतिहासिक जुन्या वेसीचे गावातील तरुणांच्या पुढाकाराने सुशोभीकरण करून या वेसीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. या वेसीचे सुशोभीकरण केल्यामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे.
नगर -पुणे रस्त्यावर असलेले शिरूरकडून नगरला जात असताना 8 किलोमीटर वर वसलेले ऐतिहासिक गाव वाडेगव्हाण. गावात जाण्याआधी महेश्वरी नदी लागते, सध्या या नदीचे पात्र लहान झाले आहे. नदीच्या कडेला असलेले शिवशंकराचे मंदिर, त्यानंतर प्रवेशद्वारावर असलेली मुख्य वेस गावचे वैभव. आता या वेशीचे सुशोभीकरण केल्यामुळे ही वेस सर्वांचेच आकर्षण बनली आहे.
वेसीच्या आतल्या बाजूला असलेले मारुतीचे मंदीर, त्याच्या डाव्या बाजूला असलेले गणपतीचे मंदिर, मंदिराच्या पाठीमागे असलेली बारव, बारवेमध्ये मोडीलिपीत कधी बांधली गेली त्याचा उल्लेख सापडतो. बारवेला खाली उतरण्यासाठी तळापर्यंत पायऱ्या आहेत. गावामध्ये आत आल्यानंतर खुप मोठी हवेली होती, आज त्याठिकाणी शाळेची इमारत झालेली आहे, जुने लोक सांगतात हवेली मधून भुयारी मार्ग होता तो वेसीमध्ये निघत होता.
पूर्वी संपूर्ण गावाला असलेली तटबंदी परंतु आज ती राहिलेली नाही. गावामध्ये अनेक जुने वाडे आहेत प्रत्येक वाड्यांमध्ये पिण्याची पाण्याची सोय म्हणून छोटे आड (विहीर) आहे. गावाच्या पूर्वेला असलेले ग्रामदैवत तुकाई मंदीर आणि पश्चिमेला असलेले पंचक्रोशीचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर आहे. नवरात्रमध्ये नऊ दिवस देवीचा जागर होतो.पहाटे 5.30 व सायंकाळी 5.30 ला आरती होती. चंपाषष्ठीला खंडोबाचा उत्सव असतो.
दि. 30 रोजी गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन त्या फलकाचे अनावरण केले. त्यामुळे हे प्रवेशद्वार आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.