नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सोशल मीडिया यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेदेखील कोरोनाच्या काळापासून सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाषणांमुळे युट्युबकडून दर महिन्याला पैसे मिळतात, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विद्यापीठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाचा उपयुक्तता आणि आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल यावर मोकळेपणाने भाष्य केले. कोरोना संकटामुळे आयुष्यावर झालेला परिणाम तसेच स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवरुन महिन्याला किती कमाई होते, अशा अनेक गोष्टींसंदर्भात विस्तृत चर्चा करत काही खुलासेही केले.
▪️कोरोनामुळे आयुष्यात बदल घडले.
आधी मी फारसा सोशल मीडियावर नव्हतो. कोरोना कालावधीमध्ये मी याचा जास्त वापर करू लागलो. कोरोना संकटापूर्वी फार सोशल नेटवर्किंग फ्रेण्डली नव्हतो. मी त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय नव्हतो. पंतप्रधान मोदी आम्हाला यासंदर्भातील माहिती देत यावर सक्रीय राहण्याचा आग्रह करायचे. मात्र मला ते जमत नव्हते. मात्र, कोरोना संकटामुळे सोशल मीडियावर सक्रीय व्हायला लागलो. कोरोनामुळे आयुष्यात मोठे दोन ते तीन बदल घडले, असे गडकरी यावेळी म्हणाले.
▪️ आता युट्यूबवर भगवतगीताही ऐकू लागलो.
मोबाइलवर गाणी ऐकण्याबरोबरच युट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहतो. रोज सकाळ संध्याकाळ मी २५ मिनिटं पायी चालतो. युट्यूबवर भगवतगीताही ऐकू लागलो. मला दहावा अध्याय आणि त्याचे पूर्ण विवेचन शांततेत ऐकण्याची संधी या कालावधीमध्ये मिळाली. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती, असे नितीन गडकरी यांनी नमूद केले. कोरोना कालावधीमध्ये जवळपास ९५० व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या. या कालावधीमध्ये ट्विटरवर १ कोटी २० लाख फॉलोअर्स नव्याने जोडले गेले, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
युट्युबमधून किती होते कमाई?
युट्यूबवरून जी भाषणे दिली, त्यासाठी आता युट्यूबकडून पैसे दिले जातात. आजच्या घडीला मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये दिले जातात. हे पैसे कोव्हिडसंदर्भातील कामांसाठी देणगी म्हणून दिले आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच कोरोना संकटाच्या कालावधीत आलेल्या अनेक अनुभवांवर पुस्तक लिहिले असून, या पुस्तकाच्या १० हजार इंग्रजी प्रती प्रकाशित होण्याआधीच विकल्या गेल्या, असेही नितीन गडकरी म्हणाले.