कर्जत : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दोघांची वक्तव्य त्या त्या संदर्भाने असली तरी त्यांचा एकत्रित अर्थ लावला जाऊ लागला असून भाजपच्या नेत्यांनी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येतील असा आशावाद व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनीही यावर अशीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे सरकारमध्ये काही तरी गडबड असल्याचे संकेत आहेत. तसे असेल तर जनतेच्या मनातील सक्षम पर्याय देण्यास आम्ही तयार आहोत,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी प्रा. शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या विषयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की ‘मला माजी मंत्री म्हणू नका. यावरून त्यांनी लवकरच आजी मंत्री होण्याचा सूचक इशारा दिला आहे. त्याला पुष्टी देणारे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलल्याने त्याला महत्व आहे. एकूणच हे सरकार स्थापन झाल्यापासून ते केव्हाही पडेल, अशी जनतेच्या मनात शंका आहे. याला पुष्टी देणारी वक्तव्य आणि घटना आघाडीतील नेत्यांकडूनच घडत आहेत. याचा अर्थ काही तरी गडबड सुरू आहे. याचा एवढचा अर्थ काढता येईल. त्यानंतर राज्यातील जनतेला जे अपेक्षित आहे, ते देण्याचे काम भाजप करील.’ असेही शिंदे म्हणाले.