Take a fresh look at your lifestyle.

“त्या” जादुई शब्दांने शेतकरी झाले बिनघोर !

पुणे जिल्ह्यातील 'हे' धरणही झाले 'ओव्हरफ्लो !'

 

शिरूर : भिमाशंकर आणि भोरगिरी परिसरात सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे शिरूर आणि खेड तालुक्याला वरदान ठरलेले चासकमान धरण शंभर टक्के भरले आहे त्यामुळे धरणाच्या पाच ही दरवाजातून २७०० क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

कधी कधी वरुणराजा अवकृपा करतो आणि मग चासकमान धरण भरायला काहीसा उशीर होतो. यावर्षीही तसंच झालं. चासकमानच्या भरवशावर जगणाऱ्या तिच्या शेतकरी मायबापांचा जीव टांगणीला लागला. पण अखेरीस चासकमान ‘ओव्हर फ्लो’ झाले. ‘चासकमान भरले ‘ शिरूर आणि खेडच्या कुशीत बागडणाऱ्या लाखो लोकांना हे दोन जादुई शब्द गेली अनेक वर्षे दिलासा देत आहेत. कानात प्राण आणून लोक हे दोन शब्द कुणाच्या तरी तोंडून ऐकण्यासाठी किंवा डोळ्यात प्राण आणून कुठेतरी वाचण्यासाठी आतुर झालेले असतात. कारण हे दोन शब्द पुढचे वर्षभर जीवाला बिनघोर करतात. हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा मनाला लाभणारं आत्मिक समाधान फक्त चासकमानच्या टेल टू हेड शेतक-यांनाच माहीत असतं.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह भीमाशंकर खोऱ्यात म्हणजेच चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फायदा चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास होतो आहे. पश्चिम पट्यातील आरळा नदीवर असलेले कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे त्या धरणातून होणारा विसर्ग चासकमान धरणात येत आहे. येणुरा नदीही दुधडी भरून वाहते आहे. या शिवाय सर्वच ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे. हे सर्व पाणी चासकमान धरणात येत आहे.

सर्वसाधारणपणे 15 ऑगस्टच्या आसपास चासकमान धरण भरते. यावर्षी तसे घडले नाही. काही ठिकाणी धो धो पाऊस बरसला तर काही ठिकाणी त्याने खूप वाट बघायला लावली. यावर्षी तब्बल एक महिना उशीरा चासकमान धरण भरले. दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीपासून चासकमान धरणात किती पाणी शिल्लक आहे याचं काऊंट डाऊन सुरू होतं. इथल्या जनमानसाचं चासकमानशी इतकं घट्ट नातं नातं जुळलेलं आहे. दरवर्षी घडणारी ही तशी नैसर्गिक क्रिया पण त्यातली आतुरता गेल्या दहा दशकात अजिबात कमी झालेली नाही हे विशेष.

शिरूर तालुक्यातील गाव पातळीपासून ते थेट विधानसभेपर्यंत सगळ्याच निवडणुकांमध्ये चासकमानचे पाणी हा कळीचा मुद्दा असतो. मात्र निवडणूका झाल्यानंतर सोयिस्करपणे मुद्द्याला बगल दिली जाते हा इतिहास आहे. आजही चासकमानच्या पाण्याला अडथळे ठरणारे अनेक मुद्दे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. कालव्याचे अस्तारिकरण, गळती, पोटचा-यांची कामे, कालव्यांमधील झाडेझुडपे, गाळ ,गेट दुरुस्ती, पाणीचोरी, टेल टू हेडचा वाद याकडे कधीच गांभीर्याने पाहीले गेले नाही.