Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णपदक विजेत्या उंदराने घेतला जगाचा निरोप !

जिवंत बॉम्ब शोधून वाचविले होते अनेकांचे प्राण.

कंबोडिया : सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या ‘मागवा’ नावाच्या या उंदराने जगाचा कायमचाच निरोप घेतला आहे. या कामगिरीसाठी त्याला सुवर्ण पदकही मिळाले होते. पाच वर्षाची कारकिर्द पूर्ण करून हा उंदीर जून 2021 मध्ये सेवानिवृत्त झाला होता. ‘मागवा’ नावाचा या उंदीराने कंबोडियामध्ये अनेक जिवंत बॉम्ब आणि भूसुरुंग वास घेऊन शोधले. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. मागवा या उंदाराचे वजन 1.2 किलो आणि लांबी 70 सेंटीमीटर इतकी होती. तो आठ वर्षांचा होता.
‘मागवा’ उंदराला नोंदणीकृत असलेल्या अपोपो नावाच्या चॅरिटने प्रशिक्षण दिले होते. ही संस्था टांझानिया येथील असून तिने आतापर्यंत अशा अनेक उंदरांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षित केलेल्या उंदरांना ही संस्था हिरो रॅट म्हणून संबोधते. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी या संस्थेकडून उंदरांना 1990 सालापासून प्रशिक्षण दिले जाते.
अपोपो संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, ‘मागवा’ या उंदराने गेल्या आठवड्यात शेवटचा श्वास घेतला. ‘मागवा’ उंदीर पूर्णपणे बरा होता, मात्र, वयोमानानुसार तो थकला होता. त्याने खाणेपिणे कमी केले होते. अपोपो संस्थेने प्रशिक्षण दिलेल्या उंदरांपैकी ‘मागवा’ हा सर्वात यशस्वी उंदीर होता. त्याने सुरुंग शोधण्यासाठी एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले होते. टेनिस कोर्टच्या आकाराच्या परिसरात फिरून ‘मागावा’ अवघ्या 30 मिनिटांत बॉम्ब शोधू शकत होता तिथे पारंपारिक मेटल डिटेक्टरला हे काम करण्यासाठी चार दिवस लागले असते.
स्फोटकांमधील रासायनिक कंपाऊंड शोधण्यासाठी प्रशिक्षित, ‘मागावा’ या उंदराने 141,000 चौरस मीटर (1,517,711 चौरस फूट) म्हणजेच सुमारे 20 फुटबॉल मैदानांपेक्षा जास्त जमीन वास घेऊन स्फोटकं शोधून साफ केली होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मागावाला पीडीएसए संस्थेने सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले होते. मागील 77 वर्षांमध्ये ‘मागवा’ हा असा एक उंदीर आहे ज्याला सुवर्णपदकाचा सन्मान मिळाला होता.