Take a fresh look at your lifestyle.

इस दुनिया में सबसे बडा योद्धा माँ होती है।

ज्याला आई कळाली नाही त्याचं कर्तुत्व शुन्य आहे.

 

 

या पृथ्वीवरील सर्व पराक्रमी पुरुष आणि स्रिया मातेच्या गर्भातुन जन्मास आलेल्या आहेत. ती कुस पवित्र आणि संस्कारक्षम असल्यानेच शुरवीर योद्धे जन्माला येतात.आईचं सानिध्य लाभणे म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचच सानिध्य लाभल्याचं सुख आहे.

या विश्वात सर्वात मोठी योद्धा आई आहे हे समजल्याखेरीज तिचं शौर्य कळणार नाही. त्यावर विचारमंथन केल्याखेरीज तिची महती कळु नये हे दुर्दैवच आहे पण असो…विचारमंथनातुन तरी आमचं मातृप्रेम जागं झालं तरी फार समाधाची बाब आहे.

हे विचारमंथन आस्तिक नास्तिकतेच्या कचाट्यात सापडु नये म्हणून मुद्दाम अध्यात्मिक ग्रंथ संदर्भ,दाखले टाळतो आहे. कारण आई हेच सर्वश्रेष्ठ अध्यात्म आहे.मुलगा कितीही अयोग्य मार्गाने जात असला,चुकला तरी त्याला निरपेक्ष भावाने क्षमा करण्याचं धारिष्ट्य आणि त्याला पुन्हा उभं करण्याचं सामर्थ्य फक्त मातृत्वात आहे.स्वतः उपवास करुन आपल्या लेकराचं पोट भरणरी केवळ आई!आई!! आणि आईच!!!

आई आपल्या लेकरांवर जेवढं प्रेम करते तेवढं प्रेम कोणत्याही नात्यात तयार होत नाही. उत्कट प्रेमाची उदाहरणे पहायला मिळतीलही पण त्यामागे स्वार्थ दडलेला सापडेल.आई आपल्या लेकरांवर प्रेम करते पण तिला बदल्यात काहीच नको असते.

आश्रमाच्या अनिवासी सेवेतील एक अनुभव पुन्हा सांगावासा वाटतो. नऊ वर्ष आपल्या आईकडे ढुंकूनही न पहाणाऱ्या मुलाविषयी आपल्या भावना असतील?या माऊलीने वयपरत्वे भाजीपाला,मोडाची मटकी विकुन गुजरान केली.पण वयपरत्वे चालणं फिरणं थांबलं दिसायला कमी झालं.फिनिक्सच्या अनिवासी तीर्थरुप सेवेमार्फत आम्हाला तिची सेवा करण्याची संधी मिळाली.नियमित जेवण देऊ शकणारा एक गुणी परिवार आम्हाला मिळाला.पंधरा दिवसांतुन एकदा भेटीला जायचो आम्ही. गेल्यावर तिचं ठरलेलं असायचं, मोबाईल नंबर लिहलेली एक चिठ्ठी पुढे करणार आणि फोन लावण्याची विनंती करणार.आम्ही चार सहा महीने टाळलं कारण तो नंबर होता तिच्या मुलाचा.एक दिवस तिनं हट्टच केला.चिठ्ठी पुढे करुन म्हणाली हा माझ्या मुलाचा फोन लावा.आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला,ज्या नालायक मुलानं आई तुम्हाला नऊ वर्षे मेली की जीवंत आहे याचा तपास केला नाही त्याला कशाला फोन करायचा?

मग तर ती अधिकच चिडली.माझ्या मुलाला फोन लावुन द्या नाहीतर मला तुमचं जेवन नको.नाविलाजाने मी फोन लावला आणि स्पिकरफोनवर ऑन केला.रिंग वाजली त्याने फोन उचलला,हॅलो…. हॅलो….कोण बोलतय…तोंड नाहीका बोलायला?इकडुन आई बोलायलाच तयार नाही. मी खुनावतोय आई,…तुमचा मुलगा बोलतोय बोला!पण आई काही बोलायलाच तयार नाही मग त्याने तिकडून शिव्या द्यायला सुरुवात केली.आईने ओठावर बोट ठेवून मला शांत रहायला सांगितले. तो मनसोक्त शिव्या देत होता.आईच्या चेहऱ्यावर मात्र समाधान दिसत होतं त्याने फोन बंद केला तसा माझ्या हातात मोबाईल फोन देत म्हणाली,”पोरगं सुखात हाय.”ओठानं ती हसत होती आणि डोळ्यांतून अश्रु वहात होते.मी मनोमन तिच्या मातृत्वशक्तीला वंदन करीत होतो.

तरुणांनो आपल्या आईवर जीवापाड प्रेम करा.तिनं दिलेल्या प्रेमाची परतफेड आयुष्यभर सेवा केली तरी होणार नाही. तिला तशी अपेक्षाही नाही. पण आपल्या जीवनात ती उपेक्षित राहिली तर कितीही नावलौकिक मिळवला तरी पुत्रसुख आपल्या नशिबात असणारच नाही.त्यामुळे आनंदाचा प्रपंच होणारच नाही ही काळ्या दगडावरची रेष समजा.

रामकृष्णहरी