Take a fresh look at your lifestyle.

सुख दुःख म्हणजे मानसिक खेळ!

व्यक्ती,स्थल कालपरत्वे सुख दुःखाची परिभाषा बदलते!

दुःख भोगल्याखेरीज सुखाची तहान लागत नाही. किंवा दुःखाखेरीज सुखाची किंमत कळत नाही. दुःख म्हणजे तरी काय? मनाविरुद्ध घडलेली घटना.शरीराचा अवयव निकामी होण्याने होणारे दुःखच लक्षात रहाते.इतर दुखापतीमुळे निरंतर दुःख रहात नाही.तो विचार येथे आपण करणार नाही. कारण सुख दुःख हा खेळ सर्वाधिक मनानेच खेळावा लागतो.
झोपडीत रहाणाऱ्या एका व्यक्तीला टुमदार बंगल्यात मुक्कामी रहाण्याचा योग आला.तेथे सागवानी दिवान,गादी,तक्या सगळ्या सुविधा होत्या.त्यावर झोपताना त्याला अगदी स्वर्गात असल्याचा आनंद झाला होता.पण तिथे नेहमी रहाणारी व्यक्ती ए.सी.खराब झाल्याने रात्रभर कुरकुरत होती.त्याला कधी एकदा दिवस उगवेल असं झालं होतं तर या झोपडीत रहाणाराला वाटत होतं की दिवस उगवुच नये. समान स्थितीत दोघांच्या सुखाची परिभाषा वेगळी असल्याने एकाच स्थितीत एक दुःखाची तर दुसरा सुखाची अनुभूती घेत होता.पण दोघांच्याही सुखदुःखाचं कारण एकच होतं ते म्हणजे पुर्वीच्या स्थितीचा अनुभव.
दैनंदिन जीवनातील घटनांवर सुख दुःखाची परिभाषा ठरते.आपण आपल्या मनावर तसे संस्कार करतो.
एखाद्या व्यक्तीला पिवर दुधाचा चहा नेहमीच मिळत असेल तर त्याला कमी दुधाचा चहा दुःख देऊन जातो. पण स्वतःच्याच काही कामाने चहा जेवण मिळाले नाही तर त्याचे दुःख होत नाही.
इंद्रियांना ज्या सवयी लावु त्याच पुढे कायम झाल्या नाही की दुःख ठरलेले आहे. आजपर्यंत बहुतांश लोकांना हे कायम करता आले नाही. सुखाच्या मागे दुःख लपलेले असते.हे हळूहळू पटतेच.कारण सतत परिवर्तन हा कालचक्र नियम कुणालाही तोडता येत नाही. म्हणजे आपण कळसुत्री बाहुल्या आहोत हेच सत्य आहे. पृथ्वीवर आपली उपस्थित आनंददायी ठरावी.कितीही अडकलं तरी सोडणं अपरिहार्य आहे. मग शरीरात प्राणवायू खेळतोय तोच हा प्रयत्न केला तर दुःख तयार होणार नाही.
संत सावता महाराज जीवनाचं गणित अत्यंत सोप्या भाषेत मांडतात, समयाशी सादर व्हावे।देव ठेविल तैसे रहावे।। हिच आनंदी जगण्याची रित आहे. प्रयत्नात यश नक्की आहे.
रामकृष्णहरी