Take a fresh look at your lifestyle.

विजूभाऊ औटीच होणार नगराध्यक्ष !

अखेर निष्ठेला न्याय मिळणार

 

✒️ सुदेश आबूज 
पारनेर :राजकीय जीवनात जीवापाड जोपासलेल्या पक्षातून अवहेलना झाल्यानंतर नीलेश लंके यांच्या नशिबी मोठा संघर्ष वाट्याला आला. ना पक्ष..ना पार्टी परंतु अशाही परिस्थितीत सर्वसामान्यांच्या बळावर हा गडी एकटा निघाला आणि जिंकलाही ! या संघर्षमय प्रवासात पारनेर या तालुक्याच्या ठिकाणी त्यांना सख्ख्या भावासारखे साथ मिळाली ती नंदू – विजू या औटी बंधूंची. जणू काही त्यांच्या प्रेमाची परतफेड करण्याचा आमदार लंके यांनी चंगच बांधला होता आणि आज योगायोगाने पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी खुले झाल्याने विजूभाऊ औटी यांच्या नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विजू अर्थातच विजूभाऊ औटी राजकारणाचा काहीही गंध नसलेला ध्येयवेडा हा तरूण बंधू नंदकुमार यांना शिवसेनेकडून उमेदवारी डावलली गेली. परंतू तरीही हिंमत न हरता अपक्ष उमेदवारी करून मोठया मताधिक्क्याने विजयी झालेल्या नंदकुमार औटी म्हणून पुन्हा शिवसेनेशी जुळवून घेतले.नंदकुमार औटींना नगरपंचायतीत बांधकाम समितीही देण्यात आली. मात्र ही समिती वांझोटीच ठरली.निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार त्यांच्याकडे नव्हतेच. नगरपंचायतचा अजेेंडा साहेबांच्याच कार्यालयातून तयार होत होता. केवळ सहया करण्यापूरतेच नगरसेवक उरले होते.
दरम्यानच्या काळात शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख तथा विद्यमान आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्याच्या कारणावरून शिवसेना पदाधिकारी तसेच विजूभाऊ यांचे वाद झाले. एकाच पक्षात आहोत. तालुकाप्रमुखाचे बॅनर लावण्यात अडचण काय ? अशी भुमिका राजकारणात नसलेल्या विजूभाऊंची होती. वाद सुरू झाला त्यानंतरच विजूभाऊ पेटून उठला. विजूभाऊने बॅनर लावले म्हणून सुरू झालेला वाद वैयक्तीक पातळीवर आला. विजूभाऊचे स्टोन क्रशर राजकीय दबावातून बंद करण्यात आले. दबाव आला तरीही विजूभाऊ,नंंदूभाऊ यांनी माघार घेतली नाही. वडील सदाआबा यांनीही दोघांना पाठबळ दिले. आ. नीलेश लंके यांच्या पाठीशी खंबीर फळी उभी करून औटी बंधूंनी प्राणाची बाजी लावली.
विधानसभा निवडणूकीत आ. नीलेश लंके यांचा विजय झाला त्याचवेळी विजूभाऊवर झालेल्या अन्यायाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत विजूभाऊने सामान्य जनतेसाठी वाहून घेतलंय. आमदार लंके यांच्याप्रमाणेच २४ तास ३६५ दिवस या तरूणाने सामाजिक काम केले.
आमदार निलेश लंके यांच्याप्रमाणेच राजकीय संघर्ष वाट्याला आलेल्या विजू- नंदू या बंधूंना न्याय मिळून देण्यासाठी आमदार लंके यांनी दोन वेगवेगळ्या प्रभागात एकाच परिवारातील विजय औटी व मयूरी औटी यांना राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली होती मात्र, दुर्दैवाने मयूरी औटी यांना पराभवास सामोरे जावे लागले. या नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे सात उमेदवार विजयी झाले होते मात्र सत्तास्थापनेसाठी आणखी दोन नगरसेवकांची आवश्यकता होती. पहिल्या टप्प्यात शहर विकास आघाडीच्या सौ. सुरेखा भालेकर व भूषण शेलार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ‘मॅजिक फिगर’ जुळली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे बलाबल दहा एवढे झाले.मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने सर्वांना आरक्षणाची उत्सुकता लागून होती.
दरम्यान, आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने विजय औटी यांच्या नगराध्यक्षपदाचा मार्ग आता खुला झाला आहे. यामुळे विजूभाऊच्या निष्ठेला न्याय मिळणार आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने विजूभाऊच नगराध्यक्ष होणार अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे.तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील युवक वर्गांच्या सोशल मीडियावर आत्तापासूनच शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.