Take a fresh look at your lifestyle.

आणखी दोन दिवस राहणार हाडे गोठविणारी थंडी !

नगर जिल्ह्याचा पारा घसरला.

पुणे : राज्यातील उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागांत तीव्र थंडीची लाट आली असून मराठवाडा आणि नाशिकमध्ये शीतलहर तीव्र झाली आहे.
उत्तर भारतातील अतितीव्र थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्राकडे तीव्र थंड वारे वाहू लागले असून महाराष्ट्रात आणखी दोन दिवस म्हणजे 28 जानेवारीपर्यंत अशीच हाडे गोठविणारी थंडी राहील, असे पुणे वेधशाळेचे हवामानप्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
मंगळवारी मुंबईतही अनेक भागात पारा 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याचे दिसले. मुंबईतील कडाक्याची थंडी आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचेही डॉ. कश्यपी यांनी सांगितले. विशेषतः पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या शहरांतील किमान तापमान सरासरीपेक्षा खाली घसरणार आहे.
काल (मंगळवारी) सर्वांत कमी 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाडला झाली, तर पुण्यात या हिवाळ्यातील 8.5 अंश सेल्सिअस असे नीचांकी तापमान नोंदवले गेले.
कालचे किमान तापमान
मुंबई-15.2, सांताक्रूझ-13.4, रत्नागिरी-14.1, डहाणू-13.9, पुणे-8.5, अहमदनगर-7.9, कोल्हापूर-13.8, महाबळेश्‍वर-8.8, मालेगाव-8.8, नाशिक-6.3, सांगली-13.5, सातारा-14, सोलापूर-11.2, औरंगाबाद-8.8, परभणी-10.8, नांदेड-13.2, अकोला-11, अमरावती-10.8, बुलडाणा- 9.2, ब्रह्मपुरी- 12.4, चंद्रपूर-13.2, गोंदिया- 10.2, नागपूर-10.6, वर्धा-11.5 अंश सेल्सिअस.