Take a fresh look at your lifestyle.

म्हणून तुम्ही स्वयंप्रकाशीत व्हा !

आत्मज्ञान हिच गुरुकिल्ली.

व्यवहारी जगतातुन मिळणाऱ्या ज्ञानाने केवळ जगता येईल. ते ज्ञान संपादन करावेच लागते.कारण दैनंदिन पोटापाण्यासाठी हे करणे अपरिहार्य आहे. पण जगण्यापलिकडे जीवन नसेल तर ही बुद्धी पशुवत वापरली जात आहे मग मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक कसे होईल? आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास केवळ मनुष्यालाच शक्य आहे. कारण त्याला बुद्धी सामर्थ्याने व्यक्त होण्याची कला प्राप्त आहे. हे बुद्धीसामर्थ्य जर केवळ जगण्यासाठीच म्हणजे जीवंत रहाण्यासाठीच वापरले जाणार असेल तर जनावरं आणि मनुष्यात फरकच रहाणार नाही. ते पैसा न कमावता जगतात आणि आम्ही जगण्यासाठी पैसा कमावतो एवढाच काय तो फरक राहिल.
आपण आपल्या आत डोकावल्याशिवाय आत्मशक्ती जागृत होतच नाही. शरीराच्या माध्यमातूनच हे शक्य असल्याने शरीराला त्या मार्गाने नेण्यातच खरा शाश्वत विकास आहे.
माऊली म्हणतात, तरी पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र म्हणिजे । जो हें जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथें ॥ ७ ॥१३ क्षेत्रक्षेत्रज्ञयोग
अर्जुना ऐक. या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे.
आम्हाला क्षेत्रज्ञ होता आले पाहिजे. त्यासाठी आत्मोन्नती केली पाहिजे.ध्यानसाधना हाच त्यावर उपाय आहे.अंधारात पेटवलेला दिवा कितीही छोटा असला तरी तो त्याच्या आसपासचा परिसर उजळुन टाकतो. बाह्यज्ञानाने पोपटासारखे बोलता येईल. पण त्याचा अनुभव स्वतःला काहीच नसेल.आत्मानुभुतीने मुखातून बाहेर पडलेले शब्द कल्याणकारी असतात.ते सत्य असतात.अनुभवाने बाहेर पडलेले असतात.शिवाय ते स्वतःलाही अत्यंत आनंद देणारे असतात.
दररोजच्या ध्यानाने हे शक्य आहे. ही साधना स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे. आपलं जेवढं वय असेल तेवढी मिनिटे ध्यानधारणा करावी.सुरुवातीला हे अशक्य वाटेल पण जिद्द सोडली नाही तर हळूहळू आत्मानंद प्राप्त होईल.नवे विचार तयार होतील.स्वार्थबुद्धी लोप पावू लागेल.आणि परोपकारवृत्ती जन्माला येईल.
गुरुंच्या मार्गदर्शनात आपण ध्यानपद्धती शिकलात तर लवकर प्रगती होईल. आत्मशक्ती हाच ईश्वर आहे.
रामकृष्णहरी